मृत्यूनंतर टाळमृदूंगाच्या जयघोषात काढली अंत्ययात्रा । चौदाव्याच्या दिवशी होणार मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा
पाथर्डी । वीरभूमी- 27-Feb, 2022, 05:50 PM
पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी येथे मृत्यूमुखी पडलेल्या वानराची टाळ मृदुंगाच्या जयघोषात अंत्ययात्रा काढून दफनविधी करण्यात आला. मृत्यूच्या 14 दिवसांनी हरीकीर्तन व वानराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. वानराच्या मृत्यूमुळे सर्वगावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी येथे मागील काही दिवसापासून एक वानर वास्तव्यास होते. या वानराचा शनिवार दि. 26 रोजी मृत्यू झाला. बजरंगबली हनुमानाचा वार हा शनिवार असल्याने तसेच वानराचा मृत्युही शनिवारी झाल्याने सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन रामभक्त वानराचा दफनविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मृत्यूमुखी पडलेल्या रामभक्त वानराची गावातून टाळ मृदुंगाच्या जयघोषात अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर मृत रामभक्त वानराचा दफनविधी करण्यात आला. डांगेवाडी ग्रामस्थांनी जड अंतकरणाने रामभक्त वानराला निरोप देण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा सदस्य विष्णुपंत अकोलकर यांनी सांगितले की, बजरंगबली हनुमानाचा वार हा शनिवार आहे. आणि गावात काही दिवसापासून वास्तव्यास असलेल्या वानराचा मृत्यू हा शनिवारीच झाला. यामुळे गावातून अंत्ययात्रा काढून हनुमान मंदिरासमोर दफनविधी करण्यात आला.
त्याचप्रमाणे 14 दिवसांनी रामभक्त वानराचा चौदावा करण्यात येणार असून यावेळी हरिकीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच कायम आठवण रहावी म्हणुन गावामध्ये रामभक्त वानराची मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. यावेळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले असल्याचे सांगितले.
fUMGlcQuJeLrVijm