माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या कर्जावरील व्याजदरात कपात ः चेअरमन सुरेश मिसाळ यांची माहिती
पारनेर । वीरभूमी- 13-Mar, 2022, 11:35 PM
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर 7.5 टक्क्यांवरून 7 टक्के करण्यात आलेला आहे. दि. 13 मार्च रोजी संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला असून 16 मार्च पासून या कर्जावरील व्याज दराच्या कपातीची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती चेअरमन सुरेश मिसाळ यांनी दिली.
सभासदांना ठेवीचे व्याज व लाभांश एकत्रित देता यावा यासाठी संस्थेची सर्वसाधारण सभा मे महिन्यात घेण्यात येईल व सर्वसाधारण सभेनंतर जामीन कर्जामध्ये दोन लाख रुपयांची वाढ प्रस्तावित असल्याचे व्हाईस चेअरमन अण्णासाहेब ढगे यांनी सांगितले.
जानेवारी 2022 अखेर संस्थेचे कर्ज वाटप 853 कोटी रुपये असून सर्वात कमी व्याजदर असणारी पगारदारांची संस्था ठरली आहे. मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ करणे, सेवानिवृत्त सभासदांना कृतज्ञता निधी देणे, सभासदांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देणे, जिल्ह्यातील जवान शहीद झाला तर त्यांच्या कुटुंबियांना 51 हजार रुपये मदत करणे.
अशा विविध योजनांच्या अंमलबजावणीमुळे ही संस्था राज्यात पथदर्शी म्हणून ओळखली जाते. आमचे नेते श्री भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखाली संस्था अशीच प्रगती करीत राहील असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.
पुरोगामी मंडळी सत्तेत आल्यापासून संस्थेने नेहमीच कमीत कमी दराने कर्ज वाटपाला प्राधान्य दिलेले आहे. कधीकाळी राजकारणाच्या गर्तेत अडकलेल्या संस्थेवर दीर्घकाळ प्रशासक व प्रशासक मंडळ होते.
संस्थेचा व्याजदर आज 7 टक्के झाला असून सभासदांनी दीर्घकाळ टाकलेल्या विश्वासामुळे संस्थेला स्थैर्य प्राप्त झाल्याने हे शक्य झाल्याचे मंडळाचे नेते भाऊसाहेब कचरे यांनी सांगितले.
माध्यमिक शिक्षक सोसायटीने व्याजाचा दर 7 टक्के केल्याने हा एक ऐतिहासिक व सभासद हिताचा निर्णय झाला आहे. 1998 साली भाऊसाहेब कचरे हे पहिल्यांदा चेअरमन असताना हाच व्याजदर 18.53 टक्के इतका होता. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनात हा व्याजदर टप्प्याटप्प्याने कमी करत 7 टक्क्यांपर्यंत आणला गेला आहे.
तसेच कर्ज मर्यादा ही जवळपास 18 लाखांपर्यंत झालेली आहे. त्यामुळे संस्थेचे सर्व निर्णय हे सभासद हिताचे असल्याचे मत शिक्षक बँकेचे सभासद लतिफ राजे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
mUSVCaeoEWZqGMNp