पाथर्डी । वीरभूमी- 17-Mar, 2022, 11:55 PM
भटक्यांची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या यात्रोत्सवाचा प्रारंभ सकाळी कैकाडी समाजाची मानाची काठी कळसाला लावून तर सायंकाळी गोपाळ समाजातील मानकर्यांच्या हस्ते होळी पेटवून झाला. मागील वर्षी प्रमाणेच यावर्षीही गोपाळ समाजातील पाच मानकर्यांच्या हस्ते मानाची होळी शांततेत पेटविली गेली.
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांचा यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. सकाळी कैकाकडी समाजाचे मानकरी आमदार यशवंत माने, नारायणबाबा जाधव, स्वरूपचंद गायकवाड यांचे उपस्थितीत कैकाडी समाजाची मानाची काठी वाजतगाजत नाथांचे संजीवन समाधीसह कळसाला भेटविण्यात आली. तर सायंकाळी गोपाळ समाजाची मानाची होळी शांततेत पेटविण्यात आली.
प्रारंभी दुपारी कानिफनाथ गडाच्या पायथ्याला गोपाळ समाजाचा मेळावा झाला. यावेळी समाजातील गुणवंताचा सन्मान करण्यात आला. यावेळी मानाची होळी पोलिस बंदोबस्ताशिवाय पेटवून शांततेचा संदेश द्यावा. मानपान बाजुला ठेवून सर्व समाजाने एकोप्याने होळी पेटवावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.
यानंतर ढोल, ताशांच्या जोडीने टाळ मृदुंगाच्या गजरात चैतन्य कानिफनाथांचा जयघोष करत मानाच्या गोवर्या घेण्यासाठी मानकर्यांसह समाज बांधव कानिफनाथ गडावर पोहोचले. तेथे तेथे देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष अंबादास मरकड, विश्वस्त भाऊसाहेब मरकड, डॉ. विलास मढीकर, श्यामराव मरकड, रवींद्र आरोळे यांनी मानकर्यांचा सन्मान करीत मानाच्या गोवर्या दिल्या.
तत्पुर्वी हनुमान मंदिरा जवळ तहसीलदार श्याम वाडेकर, पोलिस निरिक्षक सुहास चव्हाण यांनी पुरावे तपासत मानकर्यांची ओळख परेड घेतली.
मानाच्या गोवर्या घेऊन मानकर्यांनी वाजत गाजत ग्रामप्रदक्षिणा करत दत्त मंदिरा शेजारी असलेल्या साखर बारवेशेजारी येवून मानाची होळी शांततेत पेटविली. यावेळी विठ्ठल महाराज गव्हाणे, मानकरी नामदेव माळी, माणिक लोणारे, हरीभाऊ हंबीरराव, रघुनाथ काळापहाड, माऊली गिर्हे, पंडितराव लोणारे, कुस्तीपटू दीलीप पवार, सुरेश पवार, झेंडू पवार आदीसह पोपाळ समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
होळी पेटवितांना मानावरुन होणारे वाद टाळण्यासाठी पोलिस निरिक्षक, सहाय्यक पोलिस निरिक्षक, पोलिस उपनिरिक्षक, कॉन्सटेबल, महिला कॉन्सटेबलसह होमगार्ड असा तब्बल 64 जणांचा ताफा तैनात होता. मानाची होळी पेटविल्यानंतर राज्यभरातून आलेल्या गोपाळ समजाने होळीचे विधीपूर्वक दर्शन घेतले.
Comments