कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती भेटीदरम्यान प्रतिपादन
अकोले । वीरभूमी - 12-Apr, 2022, 11:38 PM
कोरोना एकल महिलांच्या रोजगारासाठी विविध योजना एकत्र करून बँकेमार्फत अर्थपुरवठा करण्याबाबत विचार करायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी व प्रतिमा कुलकर्णी यांनी मुंबईत त्यांना भेटून निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत पवार यांनी हे मत व्यक्त केले.
या महिलांना रोजगार देण्यासाठी व अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती केल्यावर शरद पवारांनी संपूर्ण प्रश्न तपशीलवार समजून घेतला. महिलांच्या अपेक्षा समजून घेतल्या. यावेळी उपस्थित असलेल्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशीही चर्चा केली.
महिलांच्या मालमत्ताविषयीचे कायदे असून उपयोग होत नाही. त्यामुळे त्यात सुलभीकरण होणे आवश्यक आहे अशी भावना समितीने व्यक्त केली. संजय गांधी निराधार योजनेत 21000 रुपयाची उत्पन्नाची अट 50,000 रुपये पर्यंत वाढवायला हवी यासाठी लक्ष घालावे अशीही विनंती करण्यात आली.
त्यानंतर विधानपरिषद उपसभापती नीलम गोर्हे यांची भेट घेतल्यावर त्यांनी या महिलांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न सांगितले. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना, बालसंगोपन योजना, 50,000 ची मदत मिळाली नाही अशा 1800 महिलांच्या जिल्हानिहाय याद्या कोरोना एकल महिला समितीच्या कार्यकर्त्यांनी नीलम गोर्हे यांना दिल्या.
त्या त्यांनी सर्व महसूल आयुक्तांना पाठवून 15 दिवसात या महिलांना योग्य ते लाभ मिळवून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अशा रीतीने प्रत्येक महिलेच्या समस्येकडे त्या लक्ष घालत आहेत. त्यानंतर ज्या महिलांवर कर्ज आहे, अशा महिलांची स्वतंत्र माहिती घेऊन त्या अडचणींवरही मार्ग काढण्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन वात्सल्य समितीच्या बैठका नियमित व्हाव्यात म्हणून आढावा घेण्याची विनंती केली. त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन वात्सल्य समितीला गती दिली जाईल असे सांगितले.
त्याचप्रमाणे महिला कोणकोणते व्यवसाय करू शकतात याचा अभ्यास करून कर्ज धोरण ठरवायला हवे अशी महत्वाची सूचना केली. त्यासाठी महिला कोणते व्यवसाय करू शकतात याचे सर्वेक्षण करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केले.
Comments