पाथर्डी । वीरभूमी- 13-Apr, 2022, 03:43 PM
उन्हाच्या प्रचंड विक्रमी तापमानाने जनता हैराण असताना पाथर्डी शहरात व तालुक्यात मागील आठवड्यापासून वीजेचा लंपडाव चालु आहे. भारनियमाचे कोणतेही नियोजन व वेळापत्रक नाही.
नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा खेळखंडोबा महावितरणने थांबवावा. वीजबिल वसुली चांगली असल्याने भारनियमन करू नये, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते इजाजभाई शेख, मनसेचे किरण पालवे, सोनल जोजारे, शुभम येळाई, तन्मय फुटाणे, वैभव गुंगे, ओम फुटाणे आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गर्जे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या अत्यंत कडक उन्हाळा आहे. उष्माघाताचे बळी जात आहेत. अशावेळी जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापना मार्फत जिल्हा वासियांना दुपारी उन्हाच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
तसेच घरामध्ये उन्हाच्या वेळी कायम स्वरूपी हवेची उपकरणे चालू ठेवावी. असे असतांना गेल्या काही दिवसापासून कोणतीही भारनियमाची वेळापत्रक जाहीर न करता अवेळी व मनमानी भारनियमन होत आहे. यामुळे घरातील नवजात बालके, वयोवृद्ध नागरिक, आजारी व दम्याचे रुग्ण, गर्भवती महिला यांना या प्रचंड तापमानाचा व उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच छोट्या मोठ्या व्यवसायीक व्यापार्यांना, शितपेयाची, दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे, हॉटेल व्यवसायीक यांनाही यावेळी अवेळीच्या भारनियमांचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना काळाचे संकट संपताच भारनियमाचे सुलतानी संकट आले आहे. या संकटात शहरातील सर्वस्तरातील नागरिक होरपळत आहेत.
तर महावितरण पाथर्डीचा वीज बिल वसुली बाबत जिल्हयात दुसरा क्रमांक असताना वीजबिल वसुली अत्यंत चांगली असून देखील पाथर्डीतील नागरिकांना या भारनियमाचा त्रास सहन करावा लागत आहे.
अजित पवार उर्जामंत्री असताना जेथे वीज वसुली चांगली तिथे भार नियमन रद्द असे धोरण शासनाचे होते. सध्या उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आपल्याच तालुक्याचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की, पाथर्डी महावितरणाची वसुली अत्यंत चांगली असल्याने होणार्या भारनियमातून मुक्त करावे, अन्यथा येणार्या काही दिवसात कसलीही कल्पना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
मुकुंद गर्जे, इजाजभाई शेख, किरण पालवे यांनी वीज अधिकारी यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.
ogUepZrPlwQsxzfb