पाथर्डी । वीरभूमी - 06-May, 2022, 12:21 AM
शासनाने सरकारी कामकाजात बदल करत पाच दिवसांचा आठवडा केला तेव्हा शासकीय कार्यालयीन वेळेत देखील बदल केले आहेत. शासनाने कार्यालयीन कामकाजाची वेळ ही सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी केलेली आहे. मात्र पाथर्डी पंचायत समिती कार्यालयात काही शासकीय अधिकारी व कर्मचारी हे नेहमीच उशिरा येतात.
येथे येणार्या सर्वसामान्य नागरिकांना या लेट लतीफ साहेबांची वाट पाहत तासनतास ताटकळत बसावे लागते. हे साहेब आपल्या सोयीनुसार कार्यालयामध्ये येतात. ही नागरिकांची समस्या लक्षात घेत आज आम आदमी पार्टी व सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून पाथर्डी पंचायत समितीचे मुख्य गेटवर गांधीगिरी आंदोलन करत उशिरा येणार्या कर्मचारी व अधिकारी यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
या आंदोलनात किसन आव्हाड, गोरक्ष ढाकणे, भास्करराव दराडे, सोमनाथ बोरुडे, राजेंद्र दगडखैर यांनी सहभाग घेतला
या अनोख्या आंदोलना विषयी बोलताना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड म्हणाले की, आम्ही सकाळी कार्यालयीन वेळेतनुसार गेटवर कर्मचारी स्वागतासाठी थांबलो. जवळपास 10.30 चे आसपास सुमारे 15 ते 20 कर्मचारी अधिकारी उशीरा आले.
त्या सर्वच कर्मचारी आधिकारी यांना आम्ही गुलाब पुष्प दिले. तर अनेक अधिकारी व कर्मचारी हे गेटवर आंदोलकांना पाहून पळून गेले. तसेच अनेक कर्मचारी व अधिकारी हे कार्यालयामध्ये आलेच नाहीत. यावेळी उशिराने आलेल्या एका कर्मचार्याने तर आम्हा आंदोलकांना अरेरावीची भाषा वापरून धमकी देखील दिली. त्याबाबत आम्ही उशिरा आलेल्या व अरेरावी करणार्या कर्मचार्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, यासाठी गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार देखील केली आहे.
यावेळी गटविकास अधिकारी यांनी सविस्तर माहिती घेऊन उशिरा येणार्या कर्मचारी व अधिकारी यांना नोटीस पाठवुन खुलासा घेऊ असे आश्वासन दिले आहे.
पंचायत समिती ही सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी व प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी असते. मात्र अशा कामचुकार कर्मचारी व अधिकारी यांचेमुळे जनतेच्या कामाप्रती हे कार्यालय किती उदासीन आहे हे यावरून सिद्ध होते.
पाथर्डी पंचायत समितीचे अनेक कर्मचारी व अधिकारी हे स्थानिक आहेत. त्यामळे मित्र मंडळी सोबत सातत्याने बाहेर हॉटेलमध्ये व आपआपल्या घरी जेवण करण्यासाठी जाणे. किंवा अनेक कारणे देत कर्तव्यात कसूर करतात. कोणी तक्रार केली किंवा नोटीस आली तर काहीही थातुरमातुर कारण सांगून मोकळे होतात.
अधिकारी ही असे कारण ग्राह्य धरत कागदी घोडे व कागदी प्रपंच पुर्ण करतात. परंतु कामकाजात काहीही बदल होत नाही. अशा प्रकारे या पंचायत समितीचे कारभार चालू आहे. तेव्हा यामध्ये सुधारणा करावी अन्यथा आम्ही आज गांधीगिरी आंदोलन केले यापुढे तिव्र आदोलन करू असा इशारा ही यावेळी आव्हाड यांनी दिला.
Comments