भैरवनाथ सेवा संस्थेचा सचिव सुभाष निकम बडतर्फ
संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीची दखल । सहकार संस्थांमध्ये एकच खळबळ
श्रीगोंदा । वीरभूमी - 06-May, 2022, 12:41 AM
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेचा तत्कालीन सचिव व सचिव संघटनेचा माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष निवृत्ती निकम यांनी संस्थेत अनियमित कारभार करून पदाचा गैरवापर करून आपल्या कुटुंबातील सभासदांच्या नावे बोगस कर्ज काढून कर्जमाफीचा लाभ घेतल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, राजेंद्र राऊत, युवराज पळसकर यांनी केलेल्या तक्रारीवरून निलंबित करण्यात होते.निकमवर आरोपपत्र ठेवून चौकशी अधिकारी घोडेचोर यांनी खातेनिहाय चौकशीमध्ये आरोपात तथ्य असल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीच दखल घेत नसल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. 4 मे रोजी अर्धनग्न आंदोलन करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.
या आंदोलनाची दखल घेत. दि. 2 मे रोजी सचिव निकम यांना कायमस्वरूपी बडतर्फ केले असल्याचे तसेच बेकायदेशीर कर्जमाफीप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश अहमदनगरचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर व सदस्य सचिव देविदास घोडेचोर यांनी पारित केल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे संपूर्ण आंदोलन यशस्वी झाले. या सर्व प्रक्रीयामध्ये युवराज पळसकर यांनी महत्वाची भूमिका बजावत वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
याबाबत भोस यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सुभाष निकम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या कुटुंबातील सभासद व स्वतःच्या पत्नीच्या नावे क्षेत्र नसतानाही कुटुंबातील सर्व सभासदांची मिळुन संस्थेच्या कर्मचार्याशी संगनमत करुन तब्बल 4 लाख 15 हजार 110 रुपये एवढी नियमबाह्य बोगस कर्जमाफी लाटल्याचे उघड झाल्याने दि. 22 डिसेंबर 2020 रोजी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांचेकडे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, राजेंद्र राऊत, युवराज पळसकर यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून निकम यांच्या कुटुंबातील सर्व सभासदांच्या कर्ज खात्याची उपलेखापरीक्षक, सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी तपासणी केली असता निकमने पदाचा गैरवापर करत आर्थिक गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले.
त्यामुळे नियमबाह्य कर्जमाफी घेतल्याचा ठपका ठेवत अहमदनगर जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव देविदास घोडेचोर यांनी दिनांक 03 ऑगस्ट 2021 रोजी घेतलेल्या सभेतील ठराव क्र. 3 नुसार निकम यांना भैरवनाथ सोसायटी संस्थेत आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून संस्थेचे पोटनियमबाह्य कामकाज करत संस्थेच्या आर्थिक हितास बाधा आणल्याने दिनांक 10 ऑगस्ट 2021 पासुन सेवेतुन निलंबित करण्यात आले होते.
तसेच रयत शिक्षण संस्थेचा कर्मचारी महेश महांडूळे याच्यावर लाचलुचपत विभाग अहमदनगर यांनी दि. 22 एप्रिल 2022 रोजी केलेल्या कारवाई दरम्यान करण्यात आलेल्या ऑडीओ रेकॉर्डिंगमध्ये माजी आमदाराच्या मदतीने निकम याचे निलंबन रद्द करून पुन्हा ऑर्डर करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना तीन लाखाची लाच दिल्याचे समोर आले.
त्यामुळे निकम सारख्या भ्रष्ट कर्मचार्याला साथ देणारे जिल्हा उपनिबंधक आहेर यांच्यावर कारवाई होवून निकमला कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा उपनिबंधक यांच्या दालनात बेमुदत अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार होते.
मात्र या आंदोलनाची गंभीरपणे दखल घेत जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव देविदास घोडेचोर यांनी निकम यांना दि. 2 मे 2022 पासून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आले असल्याचे आदेश पारित केले.
RWuBJOUcAXzYTKNI