नागवडे पार्टी खरोखरच ‘आपोआप’ पार्टी...
‘नेता’ तुपाशी ‘कार्यकर्ते’ उपाशी अशीच तालुकाभर अवस्था
विजय उंडे । वीरभूमी - 05-Jun, 2022, 12:28 PM
श्रीगोंदा : सहकारमहर्षी स्व. शिवाजीराव (बापू) नागवडे यांनी त्यांच्यावर निस्सीमपणे प्रेम करणार्या कार्यकर्त्यांची फळी तालुकाभर निर्माण केली. ते कार्यकर्ते आज अडगळीत पडलेले असुन राजेंद्र नागवडे यांनी ‘शिक्षक कार्यकर्ते’ हा पॅटर्न उदयास आणला आहे. बापूंना मानणार्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना गृहीत धरून निवडणुकीपुरता ‘अक्षदा’ देऊन कार्यकर्ता वापरायचा ही नीती भविष्यात नागवडे यांच्या राजकारणाला अडसर ठरू शकते.राजेंद्र नागवडे यांनी सहकारमहर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. मात्र ते यश स्वर्गीय बापूंच्या पुण्याईवर होते. भविष्यातील निवडणुकांना त्यांना सामोरे जायचे असेल तर कार्यकर्त्यांना गृहीत धरण्याची भुमिका राजकियदृष्ट्या अडचणीची ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत गावोगावी मिळत आहेत.
आमदार बबनराव पाचपुते यांचे श्रीगोंदा शहरामध्ये वर्षानुवर्षे पूर्णवेळ चालवीत असलेले माऊली कार्यालय आहे. आमदार पाचपुते त्यांच्या प्रतिनिधीमार्फत या कार्यालयातून सर्व सरकारी विभागांशी संपर्क ठेवून असतात. जनतेच्या प्रश्नांची उकल सोडवण्याचे काम या कार्यालयातून होते. राहूल जगताप यांचे आमदार झाल्यापासून कार्यालय श्रीगोंद्यात आहे. घनश्याम शेलार यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून श्रीगोंद्यात कार्यालय थाटले आहे. याउलट राजेंद्र नागवडे यांचे निवडणुकीपुरते भूछत्राप्रमाणे कार्यालय थाटले जाते. तालुक्यातील कोणत्याही कार्यालयात एखाद्या सामान्य माणसाचा प्रश्न अडला तर तो सोडवण्याची नागवडे यांच्याकडे कोणती यंत्रणा आहे? याचा त्यांनी अंतर्मनाने विचार केल्यास विधानसभा निवडणुकीच्या विजयाची सर्व गणिते त्यांच्या मनाला पटतील.
ज्ञानदीप शिक्षण संस्था, श्री छत्रपती शिक्षण संस्था, तुळजा भवानी शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेत हजारो कर्मचारी नागवडे यांच्या दिमतीला आहेत. मात्र ठराविक ‘कानाळ्या’ करणारे कर्मचारी त्या प्रामाणिक कर्मचार्यांना वेठीस धरतात. श्री छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात एक कर्मचारी बिन पगारी अन् फूल अधिकारी अशा पद्धतीने हुकूमत गाजवत आहे. तो त्याचा ‘धर्म’ प्रामाणिक निभावत आहे.
राजेंद्र नागवडे यांचे शरीर ‘सोन्याचे’ असुन कान ‘पितळी’ असल्याची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये आहे. गावोगाव त्यांना मानणारा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा संच आहे. मात्र तालुकाभर ठराविक कार्यकर्त्यांचे राजेंद्र नागवडे ऐकतात. गावोगावी गटा-तटाच्या राजकारणात एकाकी भूमिका घेतल्याने नागवडे यांना मानणारे कार्यकर्ते असूनही त्यांना न्याय न मिळाल्याने ते कार्यकर्ते पर्यायाने पाचपुते किंवा जगताप यांचा झेंडा हातात घेतात.
तुम्ही फक्त ओझेच उचला ही नीती
सहकारमहर्षी नागवडे कारखान्यात ज्या ज्या गावात उमेदवार्या मिळाल्या नाहीत. त्या गावांमध्ये नागवडे स्विकृत संचालक म्हणून संधी देतील, असे वाटले होते. आयुष्यभर प्रामाणिकपणे निष्ठावंत म्हणून बिरुदावली मिळवलेल्या कार्यकर्त्यांना संधी न देता आयुष्यभर नागवडे विरोधक म्हणून कार्यकर्तृत्व करणार्या कार्यकर्त्यांना स्विकृत संचालक करुन नागवडे यांनी काय साधले?
‘आदेश’ म्हणजे तालुकाभरातील कार्यकर्ते नव्हे...
श्रीगोंदा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी नागवडे कुटुंबाचे राजकारण जिवंत रहावे म्हणून गावोगावी नागवडे यांचे राजकारण जिवंत ठेवले. नागवडे यांच्यासाठी वाहून घेतल्याने त्यांची प्रापंचिक होळी झाली. शेकडो एकर जमीन असलेले काही जण तर एकरात आले. स्व. शिवाजीराव बापू यांच्यापासून त्यांना मानणारे कार्यकर्ते प्रत्येक गावात गर्भश्रीमंत होते. त्यातील अनेक कार्यकर्ते देशोधडीला लागले. याउलट बबनराव पाचपुते यांनी फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पंचेचाळीस वर्षे राजकरण केले. मात्र ते कार्यकर्ते आज गब्बर श्रीमंत झालेले दिसतात. एकटा ‘आदेश’ श्रीमंत झाला म्हणजे तालुकाभरातील कार्यकर्ते श्रीमंत झाले हा गैरसमज नागवडे यांनी दूर करावा.
Comments