प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत स्वबळाच्या झेंड्यांना कुणाचे दांडे...?
प्राथमिक शिक्षक बँकेच्या रणधुमाळीचा खरा शंखनाद 17 जूनपासून
अहमदनगर । वीरभूमी - 08-Jun, 2022, 12:49 PM
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू अन गुरुजींच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणार्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून उदंड मंडळ रिंगणात असताना अस्तित्वाच्या लढाईसाठी अनेकांनी स्वबळाच्या फुसक्या डरकाळ्या फोडायला सुरुवात केली आहे. पण या स्वबळाच्या झेंड्यांना कोणत्या आघाड्या-युत्यांचे दांडे असतील हे काही दिवसांत स्पष्ट होईल.कोरोनामुळे शिक्षक बँकेची निवडणूक सुमारे दीड वर्ष लांबली. मागील आठवड्यात सहकार विभागाने बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मात्र, मतदानाच्या दिवशी बारावी नीटची परीक्षा असल्याकारणाने ही निवडणूक आठ दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता 17 जुलै ऐवजी 24 जुलैला मतदान होऊन लगेच दुसर्या दिवशी म्हणजे 25 जुलैला मतमोजणी होईल. उमेदवारी अर्ज भरण्यास 17 जूनपासून सुरवात होणार असल्याने तेंव्हापासून खर्या अर्थाने या निवडणुकीतली रंगत वाढणार आहे.
बँकेच्या स्थापनेपासून या बँकेवर सदिच्छा मंडळाचे वर्चस्व राहिले, पण 2005-2006 ला डॉ. संजय कळमकर, रा. या. औटी, राजेंद्र शिंदे, रावसाहेब सुंबे व टीमने बंड पुकारत गुरुकुलची निर्मिती करत सदिच्छाच्या एकारधिकारशाहीला सुरुंग लावला. पण, गुरुकुलचा कारभार विविध कारणांनी चर्चेचा ठरल्याने अनेक शिलेदार पुन्हा स्वगृही सदिच्छा मध्ये परतले व 2011 ला पुन्हा सत्तेच्या चाव्या सदिच्छाकडे गेल्या.
पण सदिच्छामध्ये अनेक अटी व नियमांचा भंग झाल्याचा दावा करत रावसाहेब रोहोकले व बापू तांबे यांनी गुरुमाऊलीचा सवतासुभा तयार करत 2015-16 च्या निवडणुकीत बँक आपल्या ताब्यात घेतली. पण पहिल्या दिवसापासूनच या जोडगोळीचे न पटल्याने गुरुमाऊलीचे एक घाव दोन तुकडे झाले. रोहोकले सेवानिवृत्त होताच बँकेत तांबे गटाने वर्चस्व मिळविले. मधल्या काळात नगरच्या सिनेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.
आता सहकार विभागाने बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. गुरुमाऊलीचे तांबे-रोहोकले असे दोन गट, गुरुकुल, सदिच्छा, ऐक्य, इब्टा (बहुजन मंडळ), स्वराज्य, समता, शिक्षक संघाचा थोरात गट, शिक्षक भारती, साजिर महिला मंडळ अशा विविध शिक्षक संघटनाशी निगडीत 11 मंडळे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे आजचे चित्र आहे.
यातील अनेकांनी तर स्वबळाचे नारे पण दिले आहेत. मात्र कुणी कितीही दावे-प्रतिदावे करत असले तरी स्वबळावर ही निवडणूक कुणालाच सोपी जाणार नाही! बँकेसाठी 21 व विकास मंडळासाठी 17 उमेदवार देणे यातील चार ते पाच मंडळानाच शक्य आहे. त्यामुळे आघाडी-युत्यांच्या चाचपण्या यापूर्वीच सुरू झालेल्या आहेत. पण अजून कुणीही आपले पत्ते ओपन केलेले नाहीत.
अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यावर या घडामोडींना आणखी रंग चढणार आहे. कुणी कितीही स्वबळाचे नारे देत असले तरी यातील अनेक मंडळे कुणाच्या न कुणाच्या मांडावाखाली मिरवताना दिसतील!
नारे स्वबळाचे; चाचपण्या आघाडीच्या!
शिक्षक बँकेच्या या निवडणुकीत एकूण 11 शिक्षक संघटनांची मंडळे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यातील बहुतेकांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी चार ते पाचच मंडळांना बँक व विकास मंडळ असे दोन्हीकडे उमेदवार मिळू शकतात. त्यामुळे लंगडे अर्धवट पॅनल देण्यापेक्षा कुणाशी तरी जुळून घेतलेले चांगले या मनस्थितीत काहीजण आहेत. तर प्रमुख मंडळे पण स्वबळापेक्षा आघाडी, युत्या करण्याचा विचार करत आहेत. कारण एकट्याच्या बळावर निवडणूक जिंकणे हे बोलण्या इतके सोपे नाही!
Comments