नवरदेवाची 5 लाखांची फसवणूक । आणखीही काही तरुणांना गंडा घातल्याचा संशय
श्रीगोंदा । वीरभूमी- 09-Jun, 2022, 10:00 PM
श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील सधन शेतकरी कुटुंबातील एका तरुणाचा सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम 2 लाख 41 हजार रुपये असा साज करून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन वर्धा जिल्ह्यातील बबली बरोबर सोमवार दि. 6 जून रोजी लग्न लावून दिले होते. गुरुवार दि. 9 रोजी पहाटेच्या सुमारास नव विवाहिता बबलीला घेऊन साथीदार बंट्या पळून जात असताना नवरदेव व नातेवाईकांनी बंटी-बबलीला पकडुन श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भानगाव येथील एका रखडलेल्या लग्नाळू तरुणाचे लग्न जमत नव्हते. कोपर्डी (ता. कर्जत) येथील एजंट व हिंगणघाट (वर्धा) येथील पुनम मावशी, बंट्या व किनवट (ता. उमरखेड) येथील शकुनी मामा या चांडाळ चौकडीने मिळून भानगाव (ता. श्रीगोंदा) येथील लग्नाळू मुलगा याचे 2 लाख 41 हजार रुपये रोख रक्कम घेऊन बनावट नवरी बबलीबरोबर लग्न लावण्याचे ठरले.
दि. 6 जून रोजी लग्नाचा मुहूर्त काढला. रखडलेल्या नवरदेवाने खुशीत मुलीला सोन्या चांदीचे अडीच लाखांचे दागिने, भरजरी कपडे घेऊन थाटामाटात लग्न केले. गुरूवार दि. 9 रोजी नवरदेवाच्या घरातील सर्व झोपेत असताना नवरी बबली गाशा गुंडाळून पळून जाण्यासाठी गावातील पोही फाट्यावर आली.
बंट्या इंडिगो कार घेऊन वाटच पाहत होता. तेवढ्यात नवरदेवाच्या नातेवाईकांनी बंटी आणि बबलीला पकडले तर गाडी चालक पसार झाला. नवरदेवाच्या नातेवाईकांनी बंटी व बबलीला पोलिसांच्या हवाली केले. यातील नवरी बबलीकडे अनेक बनावट आधारकार्ड असून अद्यापपर्यंत किती जणांना गंडा घातला हे पोलिसांच्या सखोल चौकशी नंतरच उघड होणार आहे.
गेल्या 20-25 वर्षांपूर्वी मुलाच्या अट्टाहासापायी अनेक कुटुबांनी व डॉक्टरांनी स्रीभ्रूण हत्या केल्या. याचा परिणाम आत्ताची लग्नाळू पिढी भोगत आहे. अनेक बागायदारांना नवर्या मुलीची चणचण भासत असल्याने रखडलेले नवरदेव व पालक एजंट मार्फत मराठवाडा व विदर्भातून अक्षरशः नवर्या विकत घेत आहेत. या असहायतेचा फायदा घेऊन अनेक फसवेगिरी करणारे एजंट टोळ्या कार्यरत झाल्या आहेत.
यापूर्वीही अनेकांना याचा फटका बसला आहे. श्रीगोंद्यात पकडलेल्या बबलीने आत्तापर्यंत 26 विवाह केल्याची चर्चा आहे. अजूनही कुणाची फसवणूक टाळण्यासाठी नवर्या मुलाच्या पालकांनी सर्व बाजू तपासून घेतल्या तरच ‘मुलाचा’ मामा बनण्यापासून सुटका होऊ शकते.
Comments