झेडपी निवडणुकीत नेत्यांचे कार्यकर्त्यांपेक्षा कुटुंबप्रेमच भारी ठरणार
नेत्यांनी आढळगाव गट वगळता इतर गट आपापसात वाटून घेतल्याचे चित्र
विजय उंडे । वीरभूमी - 12-Jun, 2022, 10:57 AM
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात आमदारकी, साखर कारखाने निर्विवादपणे नेत्यांची झाले आहेत. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या मुलांसाठी किंबहूना कुटुंबातील व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी आढळगाव गट वगळता अन्य सहाही गट नेत्यांनी आपापसात वाटून घेतल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.आगामी जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गटांची पुनर्रचना करण्यात आली. पूर्वी जिल्हा परिषदेचे सहा गट होते. पुनर्रचनेत लिंपणगाव जिल्हा परिषद गटाची नविन पुनर्रचना झाली. लिंपणगाव जिल्हा परिषद गट नागवडे यांचा बालेकिल्ला बनला आहे. नागवडे सांगतील तो उमेदवार तेथून निवडून येऊ शकतो. कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी नागवडे कुटुंबीयांना त्यांच्या तिसर्या पिढीचे ‘लॉन्चिंग’ करण्यासाठी नामी संधी आली आहे. पृथ्वीराज नागवडे हे विना अडथळ्याचे जिल्हा परिषदेत जाणार आहेत. महिला आरक्षण किंवा अन्य आल्यास पृथ्वीराज नागवडेंची गोची होऊ शकते.
काष्टी जिल्हा परिषद गट आमदार बबनराव पाचपुते यांच्यासाठी सोयीचा झाला आहे. या गटातून आमदार पाचपुते त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांना पुढे आणण्याची शक्यता आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पालकमंत्री असताना आमदार पाचपुते यांनी विक्रमसिंह यांना लोकसभा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार केले होते.
तेथेच आमदार पाचपुते यांच्या राजकारणाची फरफट झाल्याचे जिल्ह्याने अनुभवले आहे. त्याचवेळी राजेंद्र पाचपुते यांच्या ऐवजी विक्रमसिंह पाचपुते यांनी पंचायत समिती निवडणुक लढविली असती तर ते सभापती झाले असते. श्रीगोंद्याच्या राजकरणात आज ते प्रस्थापित म्हणून स्थापित झाले असते. ती चूक यावेळी आमदार बबनराव पाचपुते कोणत्याही परिस्थितीत करणार नाहीत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातुन विक्रमसिंह यांना जिल्हा परिषदेत पाठवतील. आमदार पाचपुते घराण्याचे भविष्यातील अंधारमय राजकारण विक्रमसिंह यांच्या राजकीय प्रवेशाने प्रकाशमय करतील.
बेलवंडी जिल्हा परिषद गट अण्णासाहेब शेलार यांच्या सोयीचा झाला असून जिल्हा परिषदेत जाण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला आहे. पिंपळगाव पिसा गटात माजी आमदार राहूल जगताप हे त्यांची पत्नी डॉ. प्रणोती जगताप यांना पुरुष किंवा महिलेचे कोणतेही आरक्षण आले तरी त्यांच्या सौभाग्यवतींना पुढे आणतील. कोळगाव जिल्हा परिषद गटात दत्तात्रय पानसरे हे स्वतः किंवा त्यांच्या पत्नीच्या रूपाने उमेदवारी करतील. त्यांचा सामना घनश्याम शेलार यांचे चिरंजीव प्रविण शेलार यांच्याशी होण्याची दाट शक्यता आहे.
मांडवगण जिल्हा परिषद गटात परंपरागत विरोधक असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस व आमदार अरुण जगताप यांच्या कुटुंबात लढत होणार हे सांगण्यासाठी भविष्यवाणीची गरज नाही.
एकमेव आढळगाव जिल्हा परिषद गट तालुक्यातील नेत्यांनी कार्यकर्त्यांसाठी सोडला आहे. कार्यकर्त्यांमध्ये झुंजी लावण्यासाठी नेते या ठिकाणी यशस्वी होणार आहेत. तालुक्यातील नेत्यांना येथे सुद्धा संधी असती तर कार्यकर्त्यांचा या ठिकाणी टिकाव लागला नसता. तालुक्यातील नेत्यांच्या दुर्दैवाने कोणत्याच नेत्याचे गाव या गटात समाविष्ट नाही. या जिल्हा परिषद गटात राजेंद्र मस्के, हरिदास शिर्के, रमेश गिरमकर, रोहिदास पवार, अनिल ठवाळ, झुंबरराव दरेकर, विजय शेंडे, उत्तमराव राऊत हे प्रमुख दावेदार राहणार आहेत.
निवडणुकीत नेत्यांचे पुत्रप्रेम उफाळून येणार?
जिल्हा परिषदेचे गट तालुक्यातील नेत्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी सोयीचे करून घेण्याइतपत सोयीस्कर झाले आहेत. नेत्यांच्या पुढच्या पिढीसाठी हे गट सोयीचे वाटत असले तरी आरक्षणाची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. आरक्षण सोयीचे निघावे यासाठी तालुक्याचे सर्वच नेते देव पाण्यात घालून बसले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील नेत्यांचे पुत्रप्रेमासाठी वाट्टेल ते? हे पाहण्याची वेळ कार्यकर्त्यांवर येणार आहे.
Comments