पोलिसाच्या जीवावरील बोटावर निभावले
शेवगाव तालुक्यातील घटना । ताब्यातील आरोपीवर केलेला वार पोलिस कर्मचार्याच्या बोटावर आला
शेवगाव । वीरभूमी - 04-Jul, 2022, 10:45 PM
दोन गटात सुरु असलेल्या भांडणाची माहिती मिळताच घटनास्थळावरून मारहाणीच्या घटनेतील एकाला सुरक्षीतपणे घेऊन जात असतांना त्या व्यक्तीवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात पोलिस कर्मचार्यांच्या हाताची दोन बोटे तुटली. ही घटना शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथे रविवारी रात्री घडली. पोलिस कर्मचार्याच्या जीवावर बेतलेले हातावर निभावल्याने मोठा अनर्थ टळला.याप्रकरणी पोलिसांवर हल्ला करणार्या अर्जुन विठ्ठल खंडागळे (वय 48) व ज्ञानेश्वर रामा खंडागळे (वय 20, दोघे रा. कोळगाव, ता. शेवगाव) या दोघांवर तर दोन गटातील मारहाणीप्रकरणी अण्णा तुकाराम खंडागळे (वय 55, रा. कोळगाव, ता. शेवगाव) यांच्यावर स्वतंत्रपणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनांमध्ये कोळगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्तव्य बजावत झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोकाँ. संदीप उबाळे यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे तर जमावातील हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जणांना अहमदनगर येथे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत लक्ष्मी थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जुन्या भांडणाच्या कारणावरून अण्णा खंडागळे याने वडील भगवान दशरथ खंडागळे, आई पार्वती भगवान खंडागळे यांना शिवीगाळ करुन हातात लोखंडी कोयता घेऊन डोक्यावर, हातावर वार केले. दोघांनी आरडाओरड केल्याने नातेवाईक सुनील संतोष हिवाळे, मारिया सुनील शेवाळे आणि मी धावत आले असता आमच्यावर ही त्याने कोयत्याने वार केले.
यामध्ये आई, वडील, नातेवाईक जबर जखमी झाले. तर मला ही जबर मार लागला. या अगोदरही अण्णा खंडागळे याने अनेकवेळा आई-वडीलांना मारहाण करुन दहशत निर्माण केली असल्याचे म्हटले आहे. थोरात यांच्या फिर्यादीवरुन अण्णा खंडागळे याच्या विरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करीत आहेत. जखमींना उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तर दुसरी फिर्याद पो.कॉ. परशुराम नाकाडे यांनी दिली. त्यात म्हटले आहे की, कोळगाव येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणारी झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली. त्यांनी त्वरीत सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मी व सहकारी संदीप उबाळे दोघे जण घटनास्थळावरून आरोपी अण्णा खंडागळे यास पकडून गाडीकडे घेवून जात होतो.
त्याच वेळी अर्जुन विठ्ठल खंडागळे याने ‘त्याला सोडा, मी त्याला जीवे ठार मारणार आहे. असे म्हणत त्याच्याकडील कोयत्याने अण्णा खंडागळे याच्यावर वार केला. मात्र तो त्याला न लागता पो. कॉ. संदीप उबाळे यांच्या हाताच्या बोटावर लागला. यामध्ये त्यांची दोन बोटे तुटली असून ते गंभीर जखमी झाले. पोकॉ. संदीप उबाळे यांच्या जीवावरील बोटावर निभावले.
पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आरोपी अर्जुन खंडागळे यास कोयत्यासह तर ज्ञानेश्वर रामा खंडागळे (वय 20) व अण्णा खंडागळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाकाडे यांच्या फिर्यादीवरुन अर्जुन खंडागळे व ज्ञानेश्वर खंडागळे यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून जबर जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा पुढील तपास सपोनि. आशिष शेळके हे करीत आहेत. या घटनेतील जखमी पो.कॉ. संदीप उबाळे यांना औरंगाबाद येथे तर इतर पाच जणांना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
XljJqugtiv