बिंगो जुगाराने कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा
शेवगाव । वीरभूमी - 22-Jul, 2022, 01:23 PM
शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील एका 37 वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. 21 रोजी सकाळी घडली. सोपान नामदेव धुमाळ असे मृत युवकाचे नाव आहे.
सोपान धुमाळ याने बिंगो नावाचा जुगार खेळून कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची परिसरामध्ये चर्चा आहे. मात्र मृत्यूचे कारण गुलदस्त्यात असून याबाबत पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सोपान धुमाळ हा सकाळी शेतामध्ये काम कऱण्यासाठी गेला होता. त्याचवेळी तो तेथेच पडलेल्या अवस्थेत नातवाईकांना आढळून आला. नातेवाईकांनी त्यास उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. शवविच्छेदन केल्यानंतर देवटाकळी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी पंचनामा केला. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे.
त्याच्या मागे आई, वडील, दोन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे. त्याने यावर्षी मुलाला पैठण येथील वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला होता. त्याच्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोपान धुमाळ यास बिंगो जुगार खेळण्याचा नाद होता. तो भातकुडगाव परिसरामध्ये बिंगो नावाचा जुगार (चक्री) खेळायचा. त्यात तो कर्जबाजारी झालेला होता. याच कारणामुळे त्याने विषारी औषध घेवून आत्महत्या केली असल्याची परिसरामध्ये चर्चा आहे.
पोलिसांची भूमिका ‘येरे माझ्या मागल्या’
शेवगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामिण भागात जुगार, मटका, बिंगो, अवैध वाळू वाहतुक यासह अनेक अवैध धंदे जोमात सुरु आहेत. नवीन पोलीस निरीक्षक हजर झाल्यानंतर अवैध धंद्यांना आळा बसेल अशी नागीरकांची अपेक्षा होती. मात्र आजचा हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांचे ‘येरे माझ्या मागल्या’ प्रमाणे सुरु आहे. हे अवैध धंदे कधी बंद होणार याची नागरीकांना प्रतिक्षा आहे.
vRVdYpMlwtNb