तब्बेतीची विचारपूस करताना महाविद्यालयीन मैत्रीला उजाळा
विजय उंडे । वीरभूमी - 22-Jul, 2022, 01:35 PM
श्रीगोंदा : महाविद्यालयीन मित्र असलेले माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस या दोघात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय समझोता होण्याची दाट शक्यता आहे.
आमदार बबनराव पाचपुते व बाबासाहेब भोस हे सत्तरच्या दशकात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अहमदनगर मधील न्यू आर्टस महाविद्यालयात कब्बडी खेळात पारंगत होते. आमदार बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, आमदार भिमराव धोंडे या त्रिकुटाने कब्बडी स्पर्धा राष्ट्रीय स्तरापर्यंत गाजवल्या. त्यांच्यातील मैत्रीचा धागा व्यक्तिगत पातळीवर कायम टिकून राहिला. मात्र राजकीय पातळीवर कधी कटुता तर कधी मैत्री अशा प्रकारे राहिल्याचे तालुक्याने अनुभवले आहे.
राजकीय दृष्ट्या आमदार बबनराव पाचपुते व बाबासाहेब भोस यांनी अनेकवेळा संघर्ष केला. बबनराव पाचपुते कायम विधानसभेला बाजी मारत गेले. मात्र बाबासाहेब भोस यांचे विधानसभेचे स्वप्न कायम अधुरे राहीले. गेल्या दहा वर्षाचे राजकीय चित्र पाहिले तर श्री भोस यांनी विधानसभेचा नाद सोडून दिल्यातच जमा आहे.
आमदार बबनराव पाचपुते व बाबासाहेब भोस यांनी त्यांचे व्यक्तिगत पातळीवर राजकारण जोमात केले. मात्र दोघांची मुले राजकारणात अडखळत आहेत. मुलांच्या भविष्यासाठी हे दोन्ही नेते त्यांच्यातील कटूतेला तिलांजली देऊन भविष्यात एकत्रित आल्यास नवल वाटायला नको बाबासाहेब भोस यांच्यावर मणक्याच्या आजारात नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली. श्री. भोस यांना भेटण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते गेले त्यावेळी या दोघा मित्रांमध्ये दीर्घकाळ खुलून चर्चा झाली.
तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार राहुल जगताप यांची आमदार अरुण जगताप सातत्याने पाठराखण करत आहेत. मांडवगण जिल्हा परिषद गटावर गेल्या तिन पंचवार्षिक निवडणुकांपासून आ.अरूण जगताप यांचा कायम वरचष्मा राहिला आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत बाबासाहेब भोस यांच्या स्नुषा थोडक्या मताने पराभूत झाल्या. त्याची सल श्री. भोस यांना कायम राहिली आहे.
मांडवगण जिल्हा परिषद गटात बाबासाहेब भोस यांना मोठा जनाधार आहे. तसेच आमदार बबनराव पाचपुते यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या दोन शक्ती एकत्र आल्यास एकहाती भोस जिल्हा परिषद गट जिंकू शकतात. हे दोन दिग्गज नेते एकत्र यावेत यासाठी दोघांचे समर्थक एकमेकांवर दबाव वाढवत आहेत.
मांडवगण जि. प. गटात भोस-जगताप लढाई पुन्हा रंगणार
बाबासाहेब भोस सर्वपक्षीय आघाडी करून त्यांच्या स्नुषा गौरी गणेश भोस यांना जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून उतरवणार आहेत. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ओबीसीच्या आरक्षणावर ओबीसी समाजातील उमेदवार देणार असून कुणबी उमेदवारांना उमेदवारी देणार नसल्याची घोषणा नुकतीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. त्यामुळे मांडवगण जिल्हा परिषद गटात ओबीसीचे आरक्षण आल्यास सचिन जगताप यांची पंचाईत होणार आहे.
eisWlckuy