धनंजय मुंडेंनी शिंदे-फडणवीसांचा कित्ता गिरवला
भाजपा नेत्यांसह आमदारांनीही दिल्या डिट्टो शुभेच्छा । शुभेच्छा पेक्षा राजकीय अनुल्लेखांचीच चर्चा
अहमदनगर । वीरभूमी - 27-Jul, 2022, 01:57 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे आमदार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्छा देतांना ‘शिवसेना प्रमुख’ हा शब्द टाळत फक्त माजी मुख्यमंत्री म्हणुन शुभेच्छा दिल्या आहेत. हाच कित्ता धनंजय मुंडे यांनी गिरवल्याने राजकीय जाणकरांच्या भूवया उंचावल्या आहेत.विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँगेस नेते, शिवसेना नेते आणि समर्थकांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतांना ‘शिवसेना पक्षप्रमुख’ म्हणुन उल्लेख केलेला आहे.
आज शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा पेक्षा त्यांच्या राजकीय अनुल्लेखाचीच चर्चा सध्या जोरात सुरु आहे. राज्यातील सत्ता बदलाच्या घटनापाठोपाठ एकमेकांना टार्गेट करण्याचे काम राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 50 आमदारांना सोबत घेत भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा सोबत गेलेल्या आमदारांमध्ये दररोज दावेप्रतिदावे सुरू केले जात आहेत.
त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना....” अशा शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्छा देतांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणुन उल्लेख टाळला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कित्ता गिरवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतांना ‘शिवसेना पक्षप्रमुख’ म्हणुन उल्लेख टाळला आहे. शिंदे-फडणवीस यांचा कित्ता गिरवत राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतांना ‘शिवसेना पक्षप्रमुख’ म्हणुन उल्लेख टाळाला आहे.
धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा देतांना ट्विट मध्ये म्हटले आहे की, “कोरोनाच्या कठीण काळात सबंध महाराष्ट्राला सावरून सर्वांना वेळोवेळी धीर देणारे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेबांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना. ’धनंजय, बीडला ऊसतोड कामगारांचा मेळावा घेऊ, तिथे ऊसतोड कामगारांच्या लेकरांच्या हातात कोयता नाही तर वही आणि पेन देऊ...’ असं मायेने व तितक्याच विश्वासाने उद्धवजींनी बोललेलं मला आजही आठवतं!” असे म्हटले आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण आदीसह राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांनी शुभेच्छा देतांना ‘शिवसेना पक्षप्रमुख’ म्हणुन आवर्जुन उल्लेख केलेला आहे.
एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या आमदारांबरोबर गुवाहटी येथे गेलेल्या प्रहारचे आ. बच्चु कडू यांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतांना ‘शिवसेना पक्षप्रमुख’ म्हणुन उल्लेख केलेला आहे. यामुळे आजच्या शुभेच्छा पेक्षा राजकीय अनुल्लेखाचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Tags :
MeFioPCEQStrWm