अकोले तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा
लोकप्रतिनीधीचे जाणूनबुजून दुर्लक्ष । संतप्त नागरीकांचा आज रास्ता रोको
अकोले । वीरभूमी- 19-Aug, 2022, 08:04 AM
सर्कशीतील मृत्यूगोलास कुणाचीच दाद न मिळे, इथे रस्त्यावर बनले आता मृत्यूचे सापळे’ अशा प्रकारची दयनीय अवस्था तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची झाली आहे.दरम्यान या सर्वच रस्त्यांच्या प्रचंड दुर्दशेबाबत आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता अगस्ति मंदिर कॉर्नर, देवठाण रस्ता येथे तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा, शिवसेनेचे युवानेते महेशराव नवले व पंचायत समितीचे माजी सदस्य, भाजपचे युवा नेते अरुण शेळके यांनी दिला आहे. या आंदोलनासंदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदनही देण्यात आले आहे.
अकोले येथील महात्मा फुले चौक ते ओम साई डेअरीपर्यंत देवठाण रस्ता खड्डे आणि चिखलात हरवला आहे. अशीच अवस्था अकोले-परखतपुर-वाशेरे रस्ता, अकोले ते कारखाना रस्ता, अकोले -कुंभेफळ-कळस रस्त्याची झाली आहे. रस्त्याला कुणी वाली आहे की नाही, अशी संतप्त भावना स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून ऐकू येत आहे.
अकोले शहरातील महात्मा फुले चौक ते ओमसाई दूध डेअरीपर्यंत देवठाण रस्ता खड्डे आणि चिखलात हरवला आहे! वाहनचालकांना रस्ता (धावपट्टी) शोधून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर निळवंडे कालव्याच्या पुलासाठी कंत्राटदाराने खोदकाम केले होते. खोदकाम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या गटारी बुजवून टाकल्या.
मुरुमाऐवजी चिकन माती पसरवल्यामुळे या कालव्यावरील पुलाच्या दक्षिण आणि उत्तर बाजूला चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे आणि चिखलामुळे निसरड्या झालेल्या रस्त्याच्या अवशेषांवरून वाहने चालवताना रोज येजा करणार्यांना एक मोठे ‘अग्निदिव्य‘ पार करायला लागत आहे. येथून स्कुटीवरून जाणार्या महिलांना अपघात झाले आहेत.
मड बाईकिंगसाठी बनवलेला हा स्पेशल ट्रॅक नसून हा अकोले- देवठाण रस्ता असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी दिली असून संबंधित विभागांना या प्रश्नांचे कुठलेही सोईर सुतक राहिले नसल्याचे चासकर यांनी म्हटले आहे.
अकोले तालुक्यातील अनेक महत्वाच्या रस्त्यावर सगळीकडे मोठे खड्डे पडल्याने दुचाकीवर प्रवास करणार्या प्रवाशांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास सुरु झालाय. नागरिकांचे आरोग्य बिघडण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कारणीभूत आहे. दरवर्षी केवळ तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी संपूर्ण रस्ता नव्याने करण्याची गरज आहे.
तालुक्यातील मुख्य रस्त्यांची जर अशा प्रकारे दुरावस्था असेल तर अन्य विभागातील रस्त्यांबाबत न बोललेच बरे अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून ऐकू येत आहे. जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग डोळ्यांवर कातडे ओढून बसलेले आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या दोन्ही विभागांच्या संवेदनशून्य कारभाराबाबत वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
बारी ते संगमनेर या कोल्हार-घोटी रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले मात्र पहिल्याच पावसाळ्यात या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. यावरून रस्त्याच्या कामाच्या दर्जा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यासंदर्भात तालुक्याचे लोकप्रतिनिधी कोणत्याही स्वरूपाचा आवाज उठवत नसल्याची खंत सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक व्यक्त करत आहेत. व ते या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. मागील वर्षी ही या बाबत त्यांनी लोकांसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना फोन वरून झापले मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. मग जनतेसमोर लोकप्रतिनिधी नुसती स्टंटबाजी करीत असतात, असा आरोप भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी केला.
Comments