विजय उंडे । वीरभूमी - 24-Aug, 2022, 10:00 AM
श्रीगोंदा : एकेकाळी राज्यात काँग्रेसची हवाच हवा होती. स्व. वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सगळं मंत्रिमंडळ स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पाठीशी उभे करूनही त्यांना सलग तीन वेळा ‘पंजा’च्या चिन्हावर पराभव पत्करावा लागला. स्व. बापू बापूच होते. तरीही त्यांना पराभव चाखावा लागला. नागवडे कुटुंबातील नवनेतृत्व जोपर्यंत सर्वसामान्यात मिसळत नाहीत तसेच अनेक जातीत विखुरलेल्या समाजातून त्यांच्याबद्दल विश्वासाहर्ता तयार होत नाही तोपर्यंत आमदारकीचे त्यांचे स्वप्न भंगच होणार आहे.
श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणावर मराठा समाजाचे आजपर्यंत वर्चस्व राहिले आहे. मराठा समाजाच्या खालोखाल माळी, धनगर, कुणबी, मागासवर्गीय, मुस्लिम, बारा बलुतेदार मोठा समाज आहे. तालुक्यातील कुणबी समाज बरोबर घेऊन माळी, धनगर, मागासवर्गीय यांची मोट बांधत आमदार बबनराव पाचपुते यांनी सात वेळा विधानसभा जिंकून दाखवली. वतनदार मराठा समाजाने कायमच नागवडे कुटुंबाची पाठराखण केली.
वतनदार मराठा समाज नागवडे कुटुंबाभोवती एकेकाळी एकवटला होता. तो आता माजी आमदार राहुल जगताप, घन:शाम शेलार व नागवडे या तिघांमध्ये विभागला गेला आहे. याउलट आमदार पाचपुते यांच्याभोवती असलेले समाज अन्य कोणाही नेत्याला तुटता तुटत नाहीत.
बहुजन समाजाचे नेतृत्व म्हणुन बबनराव पाचपुते यांनी वेगळी ओळख करून दिली आहे. त्यांच्या राजकीय आयुष्यात आमदारकी वगळता अन्य पदावर अनेक बहुजन नेत्यांना बसवले. त्यामध्ये माळी समाजातून आलेल्या अण्णासाहेब शेलार यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केले.
अत्यल्प असलेल्या जैन समाजाचे बाळासाहेब नाहाटा यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केले. विलास भैलुमे यांना पंचायत समितीचे सभापती केले. तिसर्या फळीतील विस्थापित कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी पदावर बसवून आमदार पाचपुते यांनी त्यांची आमदारकी शाबूत ठेवली.
याउलट नागवडे कुटुंबीयांचे राजकरण आहे. वतनदार मराठा समाजाव्यतिरिक्त नागवडे यांनी दुसर्या कुणालाही पदे दिली नाहीत. सध्या ते ज्यांचे नेतृत्व मानतात त्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मधील अनेक महत्त्वाची पदे बहुजन नेत्यांच्या हाती सोपवली.
परिणामी त्यांचा राज्यभर डंका वाजत आहे. याचा बोध घेणे नागवडे यांना गरजेचे असताना नागवडे तोंडस्तुती करणार्या कार्यकर्त्यांच्या बळावर आमदारकीच्या हवेत तलवारी फिरवत आहेत.
विधानसभेचे तिकीट नागवडेंच्या हातचा खेळ.. मात्र पुढे काय...?
नागवडे कुटुंबाने विशेषतः स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पासुन त्यांच्या कुटुंबाने त्यांना हवे असलेल्या पक्षाचे विधानसभेचे तिकीट आजपर्यंत आणले आहे. असा आजपर्यंतचा इतिहास आहे. मात्र बहुजन समाजाशी नाळ न जुळल्याने त्यांचा विधानसभेत वारंवार पराभव झालेला दिसतो. बहुजन चेहरा म्हणुन नागवडे कुटुंबीय जोपर्यंत पूढे येत नाहीत तोपर्यंत विधानसभेचा निकाल ऐकण्यासाठी त्यांना ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही.
vkJexfWIiKzp