शेवगाव पोलिसांनी तलाठ्यासह चौघांना जुगार खेळतांना पकडले
शेवगाव । वीरभूमी- 07-Sep, 2022, 09:42 AM
शेवगाव येथील सूर्या लॉजवर विनापरवाना तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळतांना एका तलाठ्यास चौघा प्रतिष्ठीतांना ताब्यात घेतले. ही कारवाई शेवगाव पोलिसांनी केली. पोलिसांनी या जुगार्यांकडून जुगाराच्या साहीत्यासह 6 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुगार खेळणार्यांमध्ये सोपान जनार्धन थोरात (वय 37), अंकुश रमेश पाठक (वय 33), गणेश भीमराज निकम (37) व गणेश गोरख वावरे (वय 33) (सर्व रा. शेवगाव, जि. अहमदनगर) यांचा समावेश आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव शहरातील नेवासा रोडलगत असलेल्या सुर्या लॉज येथे काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत असल्याची माहिती शेवगावचे पोनि. विलास पुजारी यांना समजली. त्यांनी सपोनि. रविंद्र बागुल यांना पथकासह संबधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.
यानंतर या ठिकाणी छापा टाकला असता वरील चौघे जण तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळतांना आढळून आले. या चौघांना जुगाराचे साहित्य व 6 हजार 400 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
याबाबत पोकाँ. वासुदेव ठकाजी डमाळे यांच्या फिर्यादीवरुन वरील चौघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या जुगार्यामध्ये एका तलाठ्याचा समावेश असल्याने शेवगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
ukmtTNogbwaYZOXV