श्रीगोंदा काँग्रेस अध्यक्ष पुन्हा ‘धर्म’ संकटात
तालुका काँग्रेस अध्यक्षाच्या एकाधीरशाहीमुळे काँग्रेसी कार्यकर्ते व कारखाना संचालकांचे ‘नाथांच्या’ विरोधात नाराजीनाट्य
विजय उंडे । वीरभूमी - 12-Sep, 2022, 11:48 PM
श्रीगोंदा : नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसाच्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमानंतर श्रीगोंदा तालुक्याची काँगेस तालुकाध्यक्षांची निवडणूक झाली. या निवडणुकीला अनेक काँग्रेसी विचारवंत इच्छुक होते.माजी संचालक योगेश भोईटे या पदावर राहण्यासाठी इच्छुक होते. परंतु काँग्रेसी लोकशाहीला फाटा देत कारखाना संचलित छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचे एक कंत्राटी कर्मचारी यांनी राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात अधिकार नसताना पुढे पुढे केल्याने त्यांच्या पसंतीस उतरले व श्रीगोंदा काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी त्यांनी वर्णी लावून घेतली.
या निवडीनंतर तालुकाध्यक्ष यांनी तालुक्यातील विस्कळीत काँग्रेसी विचारधारांना एकत्र आणण्याचे काम करण्याऐवजी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक देऊन एकाधिरशाही राबविण्याचे काम चालु केल्याचा गंभीर आरोप नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर काँग्रेसच्या सर्व शाखा प्रमुख व नागवडे कारखान्याचे संचालक यांनी केला आहे.
देशात भाजपने धर्मांध राजकीय ध्रुवीकरण व तोडफोडीचे राजकारण सुरू केल्याने काँग्रेसची मूळ विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम तालुका अध्यक्ष यांचे आहे. परंतु नागवडे कारखान्याच्या संस्थेतील कंत्राटी कामगार असलेल्या व नावालाच प्राध्यापक म्हणून मिरवणार्या या अध्यक्षाची अरेरावी सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाही.
श्रीगोंदा तालुक्यातील नावाजलेल्या छत्रपती शिक्षण संस्थेतील कंत्राटी कामगार असलेल्या व्यक्तीची काँग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या निवडीनंतर या कंत्राटी प्राध्यापकाच्या हुकमशाही कार्यशैलीच्या कारनाम्याने तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते हैराण झाले आहेत.
तालुक्यात नावाजलेल्या छत्रपती महाविद्यायाचे प्राचार्य महाविद्यालयीन कामकाजा संदर्भात राजेंद्र नागवडे यांच्याशी भेटत असताना नागवडे यांना भेटावयास गेलेल्या काही छत्रपती शिक्षण संस्थेच्या विश्वस्त संचालकांना विश्रामगृहावर रोखून धरत अपमान केल्याची तालुकाभर चर्चा रंगली. हे तालुका अध्यक्ष छत्रपती महाविद्यालयात कम पगारी पण फुल अधिकारी अशारीतीने वागत असल्याचा आरोप खुद्द नागवडे कारखान्याचे संचालक व छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांनीच केला आहे.
तालुका अध्यक्ष तालुक्यात काँग्रेस वाढविण्याऐवजी एकमेकांचा अपमान करून नेत्यांच्या जवळ अनेकांच्या कानाळ्या करून पक्षांतर्गत दुही माजविण्याचा प्रयत्न करून कारखाना संचालक व छत्रपती शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांचा पाणउतारा करण्याचा अजेंडा राबवित आहेत व यामुळे छत्रपती महाविद्यालयाचा एकप्रकारे दर्जा घसरत असल्याचा आरोप दै. वीरभूमीशी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर विश्वस्तांनी केला आहे.
त्यांना तालुका अध्यक्ष पद नको रे बाबा...
कारखान्याच्या अनेक संचालकांना व महाविद्यालयातील सेवकांना वेगवेगळ्या कारणाने तालुका अध्यक्ष यांनी त्रास दिला आहे. अनेकांच्या विरोधात अविश्वासाचे वातावरण तयार केले आहे. नेत्यांनी या तालुका अध्यक्षाची उचलबांगडी न केल्यास लवकरच उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी नेत्यांनी ठेवावी, असा इशारा अनेक संचालकांनी दिला आहे. अहमदनगर दक्षिण मध्ये छत्रपती महाविद्यालयाचा आलेख उंचावत होता. पण कंत्राटी कर्मचारी असलेले व तालुका अध्यक्षपदी विराजमान झालेले हे वतनदार अध्यक्ष तालुक्यात वैचारिक प्रदूषण करत आहेत. प्राचार्यांना हातचे बाहुले बनवून मनमर्जी कारभार करण्यास भाग पाडत असल्याने छत्रपती महाविद्यायाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यांना वेळीच रोखले नाही तर मोठे बंड पुकारले जाईल.
- अनेक विश्वस्त व संचालक,
छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था.
rCUJQOZActLS