सीना धरणातील पाण्यावरुन राजकारण तापले
सीना धरणाचे सकाळी राष्ट्र्वादीकडून तर दुपारी भाजपाकडून जलपुजन
मिरजगाव । वीरभूमी- 15-Sep, 2022, 11:07 PM
कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण नुकतेच पावसाच्या व भोसा खिंडीद्वारे सोडलेल्या कुकडी ओव्हरफ्लोच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आज दि.15 रोजी सीना धरणाचे जलपूजनाकरिता राष्ट्रवादी व भाजपाच्या आमदारांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसत होते.सकाळी 9 वाजता राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार व आष्टी, पाटोदा, शिरूरचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तर दुपारी 4 वाजता भाजपाचे माजी मंत्री व विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे व आमदार सुरेश धस यांनी सीना धरणामधील पाण्याचे पूजन केले.
एकाच दिवशी वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या आमदारांकडून सीना धरणाचे जलपूजन करण्यात आल्याने एकाच दिवशी दोनदा जलपूजन हा विषय आज दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला.
कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या जलपूजन कार्यक्रमात सीना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी कोणी आणले याबाबत दावे प्रतिदावे केल्याचे दिसून आले. सकाळी झालेल्या जलपूजनाच्या कार्यक्रमात आ. रोहित पवार यांनी सीना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी भोसा खिंडीद्वारे आपण प्रयत्न केल्यामुळे आल्याचा दावा केला.
तर आ. आजबे यांनी कुकडी ओव्हरफ्लोच्या पाण्यामुळे मेहकरी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असुन सीना धरणात कुकडीचे पाणी आ. पवार यांच्या प्रयत्नातूनच आल्याचे सांगत मराठवाडा कायम दुष्काळी भाग असल्याने कुकडी ओव्हरफ्लोच्या आमच्या मागणीमुळे दोन्ही भागाला कायम पाणी मिळेल असे सांगितले.
तर दुपारी करण्यात आलेल्या जलपूजन कार्यक्रमात आ. राम शिंदे यांनी कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी कोणी आणले हे जनतेला माहित आहे. असे सांगत मागील तीन वर्षांत सीना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी आले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात तब्बल 45 दिवस कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी सुरू असल्याने आपण प्रयत्न करून हे पाणी सीना धरणामध्ये सोडले असुन कोणीही श्रेय घेऊ नये, असे त्यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.
आ.सुरेश धस यांनी आपण केलेल्या कामाचा दिंडोरा कधीच पिटला नाही, सीना बॅक वॉटर या सीना मेहकरी योजनेच्या कामाला आपण मंजुरी आणली व काम मार्गी लावले. आ. राम शिंदे यांनीच खरे सीना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी आणले. आता काय पाच-पाच वेळा जलपूजन केले जात आहे. श्रेय घेण्याचे काम होत आहे. ही दुर्दैवी बाब असल्याने थेट नाव न घेता आ. आजबे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.
सीना धरणाचे जलपूजन या कार्यक्रमात आज दोन्हीही पक्षांच्या आमदारांकडून श्रेय वाद व दावे प्रतिदावे केल्याने पुन्हा एकदा सीना व कुकडी ओव्हरफ्लोच्या पाण्याचे राजकारण पेटल्याचे दिसून आले. सीना-कुकडी पाण्याचे नेहमीच राजकारण झाले आहे. आज एकाच दिवशी दोन वेळा झालेल्या जलपूजनाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सन 2010 मधील पुनरावृत्ती झाल्याचे दिसले.
यापूर्वी सीना धरण सन 2010 मध्ये ओव्हरफ्लो झाले असता, धरणाच्या पाण्याचे सलग चार वेळा वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांकडून जलपूजन करण्यात आले होते.
आज दि. 15 रोजी दोन वेळा वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून झालेल्या जलपूजन कार्यक्रमाच्या वेळी शासकीय अधिकारी परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ksQHoNGWnRcjLyFV