लिपीकाचे धाडस अंगलट आल्याची शेवगाव तालुक्यात रंगली चर्चा
शेवगाव । वीरभूमी - 22-Sep, 2022, 08:05 PM
शेवगाव तालुक्यातील कर्हेटाकळी ते खानापूर रस्त्याच्या कामासाठी खडीची वाहतूक करणार्या वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी अनधिकृतपणे पैशाची मागणी करणार्या शेवगाव तहसील कार्यालयातील एका लिपीकास डंपर चालक व त्याच्या साथीदाराने मारहाण केली. याबाबत वरीष्ठांचे कुठलेही आदेश नसतांना कारवाईसाठी गेलेल्या लिपीकाचे धाडस त्याच्या चांगलेस अंगलट आल्याची चर्चा शेवगाव तालुक्यात रंगली आहे.
याबाबत माहिती अशी की, पैठण रस्त्यावरील कर्हेटाकळी शिवारात सुरु असलेल्या एका रस्त्याच्या कामावर काल बुधवार दि. 21 रोजी सायंकाळी शेवगाव तहसील कार्यालयातील एक लिपीक स्वत:च्या वाहनातून वरीष्ठांचे आदेश नसतांना कारवाईसाठी गेले होते.
तेथे लिपीकाने खडी वाहतुक कऱणार्या डंपर चालक व संबंधीत व्यक्तींना कारवाई टाळण्यासाठी काही रकमेची मागणी केली. संबंधीतांनी देखील त्यास होकार देवून त्याचे मोबाईलमध्ये शुटींग केले. त्यानंतर त्यास तेथेच चालक व संबंधीतांनी चांगलेच बदडले.
सायंकाळच्या सुमारास घडलेला हा प्रकार पाहण्यासाठी गर्दी होताच त्यास तेथून उचलून नेत एका फार्म हाऊसवर घेऊन जात लिपीकाची पुन्हा धुलाई केली. लिपीकाने कसबसे तेथून सुटका करुन घेत शेवगावला पळ काढला.
मात्र याबाबत दोघांनीही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे टाळले. मात्र या घडलेल्या घटनेची माहिती काही वेळातच शेवगावमध्ये समजली.
आज दुसर्या दिवशी या प्रकाराबात तहसील कार्यालयात चांगलीच चर्चा रंगली. याबाबत तहसीलदार छगन वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘मला याबाबत कुठलीही माहिती नाही. माहिती घेवून कारवाईसाठी कोण गेले होते याची चौकशी करतो’. असे सांगितले.
मागील महिण्यात एका लिपीकाला लाचेची मागणी केल्याची घटना ताजी असतांनाच काल बुधवारी घडलेला प्रकार धाडसाचाच आहे. या धुलाई प्रकरणाची आज दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती.
Comments