शिंदे शिवसेना गटाचा उत्तर नगर जिल्ह्यातील पहिला भव्य मेळावा अकोलेत
माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांची माहिती
अकोले । वीरभूमी- 23-Sep, 2022, 10:17 AM
हिंदुत्व शिवगर्जना अभियानांतर्गत शिंदे शिवसेना गटाचा उत्तर नगर जिल्ह्यातील पहिला भव्य मेळावा खा.सदाशिवराव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात लवकरच होणार आहे.अकोले तालुक्यातील तळागाळातील 10000 सच्चे शिवसैनिक या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त करुन उत्तर जिल्हाप्रमुख खेवरे नानाचे वक्तव्य लोकशाहीला न शोभणारे आसल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी म्हटले आहे.
अकोलेतील बाजीराव दराडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कट्टर शिवसैनिक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस संजय वाकचौरे, सुरेशराव भिसे, सुदाम नवले, बाळासाहेब मालुंजकर, संपत पवार, साहेबराव दातखिळे, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
बाजीराव दराडे पुढे म्हणाले की, दि. २१ सप्टेंबर रोजी मंत्री शंभूराजे देसाई व खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथे दक्षिण नगर जिल्ह्याचा हिंदु शिवगर्जना अभियान मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी अकोलेतून परस्पर 150 च्या जवळपास सच्चे शिवसैनिक उपस्थित होते.
हा मेळावा संपल्यावर शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी खा. सदाशिवराव लोखंडे यांनी बिगर पोलीस बंदोबस्तात उत्तर नगर जिल्ह्यात मेळावा घेऊन दाखवावा, असे आवाहन केले. त्या आवाहनाला उत्तर देण्यासाठी व आवाहन स्वीकारले म्हणून सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली आहे. अकोले तालुक्यात होणाऱ्या या मेळाव्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून हा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. असा दावा त्यांनी केला.
तसेच अकोले तालुक्यात शिंदे गटाची शिवसेना एक नंबरला राहील असे आम्ही काम करणार आहोत. राज्यात ना.एकनाथराव शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यापासून उत्साह आहे. दोन अडीच महिन्यात अनेक विकास कामांचा धडाका लावला आहे.
मुख्यमंत्री ना. शिंदे व खा. लोखंडे यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यात विकास कामे करणार आहोत. प्रलंबित कांमे लवकर सुरू होणार आहे. ज्यांच्यावर तालुक्यात शिवसेनेची जबाबदारी होती त्यांनी कोणतीही विकास कामे आणली नाही. संघटन वाढवले नाही, शिवसेना ही प्रायव्हेट कंपनी केली.
त्यांनी कार्यकर्त्यांवर दडपशाही करू नये. आता शिवसेनेचे दोन घरे झाली आहेत, तुम्ही आहे तेथे सुखी रहा. अराजकता माजविण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही मेळावा घेणारच आहोत. कोणी आडवे येण्याचा प्रयत्न करू नका. असा इशारा बाजीराव दराडे यांनी दिला.
दसरा मेळाव्यानंतर सभासद नोंदणी अभियान सुरू करणार आहे. संघटनेच्या वरिष्ठांचे आदेशानुसार सर्वाना बरोबर घेऊन जाणार आहे. यामध्ये गट तट राहणार नाही, मेरिट वर कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून खऱ्या शिवसैनिकांची खदखद बाहेर पडणार आहे. देखावा करणाऱ्यांना लोक ओळखतात, असा टोला लगावला.
आपण शिंदे गटाचे आहात का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दराडे म्हणाले की, ज्यावेळी शिंदे साहेब गुवाहाटीला गेले. त्यांना खा. लोखंडे यांनी साथ दिली त्यावेळी खा. लोखंडे साहेब यांना मी पहिला फोन करून आपण योग्य निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले.
संजय वाकचौरे यांनी नगर येथे मेळाव्यात हजेरी लावून आपण शिंदे गटाचे आहोत हे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीत आपण परिवर्तनाच्या बाजूचे होतो, ती त्यावेळची गरज होती. आता अकोले तालुक्याचा विकास ही गरज असल्याचे स्पष्ट केले.
अहमदनगर येथील मेळाव्याला १५० ते २०० सामान्य शिवसैनिक गेले तर त्यांना तालुक्यातील काहीजण फोन करुन धमक्या देवून तुम्हाला कोण घेऊन गेले, कशाला गेले? अशी दडपशाही करत आहे. मात्र आता अश्या दडपशाहीला कोणी शिवसैनिक घाबरणार नाही व धमकावुन कोणी थांबणार नाही, असा इशारा बाजीराव दराडे यांनी देवुन पै. खेवरे नाना आम्हाला विकासाची कामे करायचे, आम्ही कुठे जायचे हे सांगायची गरज नाही. ग्रामीण भागाची प्रश्न सोडवण्याची क्षमता ना. शिंदेंच्या शिवसेनेतच आहे, असा दावा केला.
Comments