शेवगाव तालुक्यातील दुदैवी घटना । घातपात झाल्याचा नातेवाईकांचा संशय
शेवगाव । वीरभूमी - 24-Sep, 2022, 02:02 PM
शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे कपाशीवर औषध फवारणी केल्यानंतर दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मयत असलेल्या दोघांबरोबर असलेले आणखी चौघेजण बेपत्ता असल्याने मयतांच्या नातेवाईकांकडून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वैभव आबासाहेब बिडकर (वय 28, रा. आखेगाव, ता. शेवगाव) व कृष्णा बबन काकडे (वय 30, रा. सोमठाणे, ता. पाथर्डी) असे मयत तरुणांची नावे असून याबाबत शेवगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवार दि.22 रोजी शेवगाव तालुक्यातील आखेगाव परिसरातील कपाशीवर सहा मजूरांनी औषध फवारणी केली. कपाशीवरील औषध फवारणी केल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हे सहा मजूर सोमठाणे शिवारातील एका शेतात बसले होते. हे मजूर आपआपल्या घरी पोहचले नसल्याने त्यांच्या घरच्यांकडून मोबाईलवर फोन केला जात होता.
मात्र फोन कोणी उचलत नव्हते. यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र मोबाईलवर फोन करणे सुरूच होते. दरम्यान घटनास्थळा जवळून जाणार्या व्यक्तीने मोबाईलची रिंग वाजत असल्याचे पाहून फोन उचलला. यावर दोन व्यक्ती येथे झोपल्या असल्याचे सांगितले.
त्यानंतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दोघांना शेवगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कृष्णा काकडे यास शेवगाव येथील रुग्णालयात तर वैभव बिडकर यास नगर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत मिळालेल्या खबरीवरुन शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यु रजिस्टरला नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या दोघा मयतांसोबत कपाशी फवारणीसाठी गेलेले चौघेजण घटना घडल्यापासून पसार असल्याची माहिती पोलिसांना समजली. यामुळे मयतांच्या नातेवाईकांनी हा घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले असून घटनेचा अधिक तपास केला असतांना मयतांबरोबर असलेल्या इतरांची नावे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
fSoBbDTWmn