लाखों रुपयांचे सामान जळून खाक
लतिफ राजे । वीरभूमी- 25-Sep, 2022, 12:46 AM
पारनेर ः पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील मार्तंड भुसारी यांच्या दुकानास आग लागून सर्व दुकान आगीमध्ये जळून खाक झाले. ही घटना शनिवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये दुकानाचे सुमारे तीन लाख रूपयांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे. यात मात्र कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ढवळपुरी येथील सेवा सोसायटी समोरील मार्तंड भुसारी यांच्या दुकानाला आज दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. मार्तंड भुसारी, त्यांच्या पत्नी उषा भुसारी व मुलगा अर्जुन भुसारी हे दुकानामध्ये असताना दुकानाच्या मागील खोलीमध्ये अचानक आगीने पेट घेतला. आगीचे लोट इतके भयानक होते की जवळपासच्या सर्व घरांना त्याची दाहकता जाणवली. दुकानाचे मालक मार्तंड भुसारी व कुटुंब धावत दुकानाबाहेर येऊन आरडाओरड करत उभे राहिले.
त्यावेळी जवळच असलेले शंकर भालेराव यांनी जेसीबी बोलावून दुकानाच्या मागील बाजुचे शटर तोडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. तो पर्यंत आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी व तरुणांनी आग विझविण्यासाठी घरातील पाणी बादलीने नेऊन सहकार्य केले. त्यानंतर घटनास्थळी नगर येथुन अग्निशामक दलाची गाडी येऊन आग आटोक्यात आणली. या भीषण आगीत दुकानातील जवळपास 3 लाख रूपयांचे सामान जळून खाक झाले.
आग विझविणसाठी शंकर भालेराव, सेवा सोसायटीचे चेअरमन भागाजी गावडे, राजू बुचुडे, संदीप बुचुडे, ममताजी रुपनर, पंकज केदारी, ऋषी जाधव, आयुब शेख, प्रदिप साळवे, गोटू बुचूडे, किरण केदारी, मंगेश आदमाने, रमेश जाधव, किरण थोरात, प्रशांत आदमाने, जाणकू वाव्हळ, रमेश जाधव, रोहिदास भालेराव व इतर तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले.
मार्तंड भुसारी यांच्या घराला व दुकानाला लागलेल्या आगीची ही तिसरी घटना आहे. यापूर्वीही त्यांच्या दुकानाला व राहत्या घराला आग लागल्या होत्या. सलग तीन वर्षी आग लागून त्यांचे दुकान व घर जळून खाक झाले आहे. मागील वर्षी ऐन दिवाळीतच भीषण आग लागली होती. त्यात घरातील गॅस टाकीचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही.
Comments