पाथर्डी । वीरभूमी- 30-Sep, 2022, 02:56 PM
दरवर्षी ऊस लागवड क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याने कारखान्याने गाळप क्षमता वाढवावी, अशी मागणी होत आहे. आता नोव्हेंबर 2022 अखेर वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. इथेनॉल प्रकल्पातून कारखान्याला आर्थिक स्वायत्ता मिळेल. यानंतर पुढील हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात येणार असल्याची माहिती, कारखान्याचे संचालक जि. प. सदस्य राहुलदादा राजळे यांनी दिली.
पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 च्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे संचालक तथा जि. प. सदस्य राहुलदादा राजळे व त्यांच्या सुविद्य पत्नी तथा कासार पिंपळगावच्या सरपंच सौ. मोनालीताई राजळे या उभयंताच्या हस्ते विधीवत पुजा करून करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना राहुलदादा राजळे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे हे होते. यावेळी शेवगाव-पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे, कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांच्यासह संचालक उद्धवराव वाघ, भाजपाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, बापुसाहेब पाटेकर, मंगल कोकाटे, भाजपा महिला आघाडीच्या पाथर्डी तालुका अध्यक्षा काशिबाई गोल्हार, शेवगाव तालुका अध्यक्षा आशाबाई गरड, सुनिल ओहळ, संचालक श्रीकांत मिसाळ, सुभाष बुधवंत, अॅड. अनिल फलके, साहेबराव सातपुते, शरदराव अकोलकर, डॉ. यशवंतराव गवळी, शेषराव ढाकणे, सिंधुबाई जायभाये, कुशीनाथ बर्डे, कोंडीराम नरोटे, नारायण काकडे, जे. आर. पवार, प्रभारी कार्यकारी संचालक रविंद्र महाजन आदीसह संचालक, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुलदादा राजळे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रात दरवर्षी ऊस लागवडीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे कारखान्याची गाळप क्षमता वाढली पाहिजे, अशी मागणी होत आहे. मात्र यावर्षी पथदर्शी असलेला इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित होत आहे. इथेनॉल प्रकल्पातून कारखान्याला आर्थिक स्वायत्ता मिळेल. यानंतर पुढील वर्षी कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात येईल.
इथेनॉल प्रकल्पाला केलेल्या गुंतवणुकीमुळे हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित केला पाहिजे. मागील हंगामात कारखान्याने पहिल्या टप्प्यात 138 कोटींची एफआरपी दिली. आता एफआरपीचा फरक म्हणुन 5 कोटी पेक्षा जास्त असे सुमारे 145 कोटींचे ऊस पेमेंट शेतकर्यांना मिळणार आहे. वाढते ऊसाचे क्षेत्राचा विचार करता यावर्षीच्या हंगामात कारखान्याने साडेसहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय ठरविण्यात आले आहे. त्यादृष्टीने कारखाना प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून यावर्षीचा गाळप हंगाम यशस्वी करु, असा विश्वास राहुलदादा राजळे यांनी व्यक्त केला.
यावेळी मागील गाळप हंगामात ज्या उसतोडणी मजुरांचा बैल जखमी अथवा मरण पावला आहे अशा 70 ऊसतोडणी मजुरांना विमा धानादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक सुभाष ताठे यांनी केले. सूत्रसंचलन भास्करराव गोरे यांनी केले तर संचालक बाळासाहेब गोल्हार यांनी आभार मानले. यावेळी सभासद, शेतकरी, प्रशासकीय अधिकारी, विभाग प्रमुख व कामगार उपस्थित होते.
Comments