शेवगाव । वीरभूमी - 06-Oct, 2022, 10:31 AM
या हंगामामध्ये कारखान्याने मागील हंगामापेक्षा जास्त ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवलेले आहे. या हंगामात गाळपास येणारे ऊसाचा दरही मागील हंगामापेक्षा जास्त देण्यात येईल, अशी घोषणा गंगामाई कारखान्याचे अध्यक्ष पद्माकर मुळे यांनी केली.
शेवगाव तालुक्यातील नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याचा 12 वा बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे चेअरमन तथा मुळे उद्योग समुहाचे संस्थापक पद्माकर मुळे बोलत होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक रणजीतभैय्या मुळे यांचे शुभहस्ते गव्हाण व मोळीची विधिवत पूजा करून बुधवार दि. 5 ऑक्टोबर 2022 रोजी विजयादशमीचे शुभमुहूर्तावर संपन्न झाला. तसेच बॉयलर अग्निप्रदीपन मुख्य अभियंता प्रभाकर गावंडे व सौ. छायाताई गावंडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कामगार, कर्मचारी व अधिकारी उपास्थित होते.
यावेळी पद्माकर मुळे म्हणाले, या गाळप हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दीष्ट्ये ठेवण्यात आले आहे. गाळप हंगाम लवकरच सुरु करण्यासाठीची पुर्वतयारी झालेली आहे. यावर्षी परिसरामध्ये पुरेसा पाऊस झालेला असल्याने उसाचे लागवड क्षेत्रात व उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
अतिवृष्टीमुळे परिसरातील रस्ते खराब झालेले असल्याने कारखान्यासमोर नोंदणी झालेल्या संपुर्ण उसाचे गाळप करण्याचे मोठे आव्हान आहे. कारखान्याने केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे इथेनॉलचे उत्पादन वाढविण्याचे ठरविलेले आहे. कारखान्याकडे नोंदणी केलेला ऊस तोडणी प्रोग्राम प्रमाणे गाळपास घेण्यात येईल,
नोंदणी झालेला संपुर्ण ऊस गाळपास आणण्याचा कारखान्याकडुन पुरेपुर प्रयत्न केला जाईल. तरी कोणीही तोडणी प्रोग्राम व्यतिरिक्त ऊस तोडीसाठी आग्रह करू नये, जेणे करून तोडणी प्रोग्राम प्रमाणे ऊसतोड करता येईल. तरी सर्व ऊस उत्पादकांनी आपला नोंदणी केलेला ऊस गंगामाई कारखान्यास गाळपास देऊन कारखाना व्यवस्थापनास सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन पद्माकरराव मुळे यांनी केले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजितभैय्या मुळे म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने ऊस उत्पादकांनी को-265 ऐवजी लवकर परिपक्व होणार्या, जादा ऊस उत्पादन व साखर उतारा देणार्या फुले-9057, कोव्हिएसआय-18121, को-10001, कोव्हीएसआय-8005 या सुधारित जातीचे ऊसाची जास्तीत जास्त लागवड करावी.
कोव्हिएसआय- 18121 या सुधारीत जातीचे ऊस बेणे कारखान्याचे घोटण येथील बेणे मळ्यात व परिसरातील शेतकर्यांकडे जवळपास 1000 एकर मध्ये उपलब्ध आहे. तरी शेतकर्यांनी को-265 ऐवजी कोव्हीएसआय-18121 या सुधारीत, लवकर परिपक्व होणार्या, जादा उत्पादन व साखर उतारा देणार्या उसाची लागवड करावी. तसेच लागवडी विषयीचे मार्गदर्शन घेण्यासाठी कारखान्याचे शेतकी विभागास संपर्क करावा, असे आवाहन केले.
तसेच कारखान्याने नोंदलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे नियोजन केलेले असून ऊस उत्पादकांनी ऊस तोडीसाठी परस्पर तोडणी मजूर व ठेकेदार यांचेशी संपर्क करू नये, असे आवाहन केले.
ToyMfkmsuKC