युद्ध होउन रक्तपात व महापुर, ढगफुटी होणार । सीताराम भगत यांची भविष्यवाणी
करंजी । वीरभूमी- 10-Oct, 2022, 09:59 PM
पुढील वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध होऊन रक्तपात होईल. तसेच महापुर व ढगफुटी सुद्धा होईल, अशी भविष्यवाणी मिरी येथील वीरभद्र यात्रेनिमित्त पुजारी सिताराम भगत यांनी वर्तविली.
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे शेकडो वर्षांपासून राजा वीरभद्र यात्रा उत्सव साजरा केला जातो. या यात्रेमध्ये देवस्थानचे पारंपारिक पुजारी तथा भगत हे पुढील वर्षीची भविष्यवाणी सांगत असतात. ही भविष्यवाणी खरी ठरते, अशी परिसरातील भाविकांची श्रद्धा आहे.
सर्वांचीच दिवाळी चांगली जाईल. मात्र डॉलरच्या तुलनेत लक्ष्मीला पीडा होईल. कापसाला सोन्याचा भाव येईल. गहू आणि हरभरा ही पिके जोडीने पिकली व विकली जातील. लग्नसोहळे जोमात व थाटात होतील. मात्र युद्धात रक्तपात मोठ्या प्रमाणावर होऊन नऊ लाख बांगडी फुटेल व अनेक लेकरं मायेला पारखी होतील.
यावर्षी ज्वारीचे पीक धोका देणार असून बिरोबा देवस्थानाच्या गादीला माणूस मिळणार आहे. तसेच आता पावसाचा खंड पडणार असून सटीच्या वेळेस पुन्हा पाउस पडेल, असे सांगीतले. यावेळी राजकारणाबाबत कोणतीही भविष्यवाणी भगत यांनी केली नाही.
यावेळी आसाराम भगत, भाऊसाहेब तोगे, भानुदास भगत, दत्तू भगत आदी सेवेकरी उपस्थित होते. तर यात्रा कमिटीचे राजेंद्र गवळी, राहुल गवळी, अन्सारभाई दारुवाले, जालिंदर गवळी, सुभाष गवळी, एकनाथ झाडे, बंडू झाडे, लक्ष्मण सोलाट, बंडू तोगे, विष्णू सोलाट, महेंद्र सोलाट, बाळू शिपलकर व कारभारी गवळी आदी सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments