माजी आ. चंद्रशेखर घुले यांची शासनाकडे मागणी
शेवगाव । वीरभूमी - 14-Oct, 2022, 09:38 PM
शेवगाव तालुक्यात महिनाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे सध्या अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे तालुक्यातील खरीप पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
तालुक्यात पाऊस अद्यापही सुरुच असून शेतकर्यांना हाती आलेल्या पिकांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केली आहे.
तालुक्यात सध्या सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभुमीवर ते आज शेवगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी घुले म्हणाले की, तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून कमी अधिक स्वरुपात पाऊस सुरु आहे. त्यामुळे बर्यापैकी आलेल्या कपाशी, बाजरी, तुर, मुग, सोयाबीन यासह ऊस व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक भागातील पिके पाणी साचून सडली आहेत. तर पावसाचे पाणी वाहील्याने पिकांसह जमिनीचे देखील नुकसान झाले आहे. आता बाजरी, सोयाबीनच्या काढणीचा हंगाम सुरु आहे. तर कापूस वेचण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र आठ दिवसापासून पाऊस उघडीप देत नसल्याने शेतात पाय ठेवणे अशक्य झाले आहे. बियाणे, खते व मशागतीवर प्रचंड खर्च होवूनही हाती उत्पन्न येण्याची शक्यता पावसाने दुरावली आहे.
यामुळे शासनाने प्रशासनास तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देवून तालुक्यातील शेतकर्यांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करावेत व शेतकर्यांना त्वरीत मदत जाहीर करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा ही घुले यांनी दिला.
यावेळी ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण लांडे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे संचालक संजय फडके, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ताहेर पटेल, शहराध्यक्ष कमलेश लांडगे आदी उपस्थित होते.
PLwmUuvKIncx