शेवगाव तालुक्यातील घटना । बिबट्याचे शवविच्छेदन करुन अंत्यविधी
शेवगाव । वीरभूमी- 16-Oct, 2022, 08:32 AM
मागील काही महिण्यापासून दादेगाव परिसरात वास्तव्यास असलेल्या बिबट्याने शेतकर्यांमध्ये भिती निर्माण केली होती. मात्र या बिबट्याचा वीजवाहक तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे शनिवारी दादेगाव रोडवरील माळीवाडा परिसरात उघडकीस आले.
वादळी वार्यामुळे खांबावरील वीजवाहक तार तुटून ही घटना घडली आहे. मृत बिबट्याचे वनविभागाने शवविच्छेदन करुन पाथर्डी येथे अंत्यविधी केला.
मागील काही महिण्यापासून शेवगाव शहरालगत असलेल्या दादेगाव, माळीवाडा परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली होती. यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी धजावत नव्हते. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने या परिसरात पिंजराही लावला होता. मात्र पिंजर्यात बिबट्या येत नसल्याने या परिसरातील बिबट्याची दहशत कायम होती.
दरम्यान शुक्रवारी शेवगाव तालुक्यात वादळी पाऊस झाला होता. या वादळी पावसाने बांधावर पडलेल्या वीजवाहक तारेला चिकटून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
माळीवाडा परिसरातील एका शेताच्या बांधावर शनिवारी सकाळी कुत्र्यांची टोळी ओरडत असल्याचे पाहून काही शेतकरी घटनास्थळी गेले. तर तेथे मृत बिबट्या झोपलेल्या अवस्थेत समजून अनेकांनी धूम ठोकली. ही माहिती वार्यासारखी पसरताच काहींनी धाडस करून पहुडलेल्या बिबट्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, वनरक्षक आप्पा घनवट, नारायण दराडे, वनपाल रामदास शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.
शुक्रवारी पाऊस झाल्याने वीजवाहक तार तुटून ती बांधावर पडल्याने ही घटना घडली. या वीजवाहक तारेमध्ये बिबट्या अडकला होता. तारेत पाय गुंतल्याने बिबट्याने तार दाताने तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे शॉक लागून बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे वनविभागाने सांगितले. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
शेवगावचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी अमोल जाधव यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री पाथर्डी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला.
LMpsSovJFTkQ