दरोडेखोरांच्या मारहाणीत शिरसाट दांम्पत्य जखमी । रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिणे लांबविले
टाकळीमानुर । वीरभूमी - 31-Oct, 2022, 11:09 AM
पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर शिवारातील शिरसाट वस्ती, खंडोबाचा खिळा येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ शिरसाट यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडा टाकला. चोरट्यांनी शिरसाट यांच्या वृद्ध माता-पित्याला मारहाण करत 55 हजार रुपये रोख, 12 तोळे सोने चांदीच्या दागिन्यासह पोबारा केला.
या घटनेने टाकळीमानूर परिसरात घबराट पसरली आहे. या दरोडा प्रकरणी शिरुर कासार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरोडेखोरांच्या मारहाणीत नारायण शिरसाट व कलावती शिरसाठ हे जखमी झाले असून त्यांच्यावर पाथर्डी येथे उपचार सुरु आहेत. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर कासार तालुक्यातील मानूर शिवारातील टाकळी मानूर ते मानूर या रस्त्यावर असणार्या शिरसाट वस्ती येथे शनिवारी रात्री एक ते दीडच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ शिरसाठ यांचे आई-वडील राहतात. अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरातील व्यक्तींना मारहाण करत रोख रक्कमेसह सोन्या चांदीची दागिने घेऊन पोबारा केला.
चोरट्यांच्या मारहाणीनंतर आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमी नारायण शिरसाट व कलावती शिरसाट यांना उपचारासाठी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती कळताच शिरुर कासार पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वानांनी मंकरणा नदीपर्यंत माग दाखविला. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते.
नारायण शिरसाट यांच्या पाठीत जबर मार लागला असून फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सपोनि. सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून घटनास्थळी आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
मारहाण करत दरोडा टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा. रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
otIhBzAFKrcbHnSi