गुरुवारी होणार लोकार्पण
करंजी । वीरभूमी- 16-Nov, 2022, 12:25 AM
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र लोहसर येथील जागृत काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टने 751 किलो शुद्ध पितळी ध्वज स्तंभ भैरवनाथ मंदिरासमोर उभारला आहे. त्याचे अनावरण गुरुवार दि. 17 रोजी होणार आहे.
तामिळनाडू येथील कारागिर मागील तीन महिन्यापासून ध्वज स्तंभाचे काम करत होते. देवस्थानचे अध्यक्ष अनिल गीते पाटील यांनी मागील भैरवनाथ जन्मोत्सवांमध्ये भाविक भक्तांना आणि ग्रामस्थांना आवाहन केले होते की, घरातील न वापराच्या पितळी वस्तू या स्तंभासाठी दान कराव्यात. त्यातुन जवळपास दोन हजार किलो जुने पितळी भांडे भाविकांनी दान केले.
अनेकांनी आर्थिक स्वरूपामध्ये देणगी दिली. भैरवनाथ मंदिरा समोर स्थापन होणारा हा ध्वजस्तंभ बारा लाख रुपये खर्चाचा असून महाराष्ट्रातील तिसरा भव्यदिव्यस्तंभ आहे. महाराष्ट्र मध्ये फक्त शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अशा स्वरूपाचा ध्वजस्तंभ आहे. या ध्वज स्तंभामुळे भैरवनाथांच्या वैभवात मध्ये भर पडणार असून पौराणिक संदर्भानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार या ध्वजस्तंभामुळे लोहसर परिसरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल असे पुरोहित रवींद्र जोशी यांनी सांगितले.
या ध्वज स्तंभाचे अनावरण 16 व 17 नोव्हेंबर रोजी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री, महंत ज्ञानेश्वर माऊली कराळे, महंत लक्ष्मण महाराज कराड, हभप संतोष महाराज गीते शास्त्री भगवानगड यांचे हस्ते होणार आहे.
यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. भैरवनाथ जन्मोत्सवाच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गीते पाटील यांनी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
hSbqmpWNDx