श्रीगोंद्यातील नेत्यांना आमदार होण्याची घाई मात्र पक्ष ठरेनात
कोणता झेंडा घेऊ हाती.. या गाण्यावर सगळेच नेते फिदा
विजय उंडे । वीरभूमी - 28-Nov, 2022, 09:13 AM
श्रीगोंदा : दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या राजकारणात अनिच्छितता वाढत चालल्याने मध्यावधी केंव्हाही विधानसभेची निवडणूक होऊ शकते. या भावनेतून तालुक्यातील नेते जोरदार कामाला लागले आहेत. गेल्या निवडणुकीत विधानसभेची उमेदवारी नको रे बाबा म्हणणारे सगळ्याच प्रमुख पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी चाचपणी करीत आहेत.2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप सरकारच्या दबावतंत्रापुढे त्यावेळचे विद्यमान विधानसभा सदस्य राहुल जगताप व नागवडे कुटुंबाने नांगी टाकली होती. माजी आमदार राहुल जगताप यांनी पक्षाला ऐनवेळी आपण उमेदवारी करणार नाही, असे सांगून राष्ट्रवादीची पंचाईत केली.
राहुल जगताप यांची नकारघंटा ऐकल्यावर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांना विधानसभेच्या उमेदवारीचा एबी फॉर्म घेऊन राजेंद्र नागवडे यांच्या घरी पाठवले. स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पच्छात होत असलेल्या पहिल्याच निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांचा राजकीय अनुभव कमी पडला. दोन दिवस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला ते टाळत राहिले व तिसर्या दिवशी घाईघाईत तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाहेरच्या तालुक्यात भाजप प्रवेश उरकून घेतला.
ऐनवेळी नागवडे व जगताप हे दोन्ही दादा मागे सरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण निर्माण झाली. पर्यायाने त्यावेळी कमकुवत वाटणार्या घन:शाम शेलारांना पक्षाने उमेदवारी दिली. दोन्ही दादांनी उमेदवारी न केल्याने त्यांना मानणारे मतदार विशेषतः नागवडे यांना मानणारा वर्षानुवर्षाचा मतदार चिडला. अचानक नागवडे कुटुंबीय आमदार बबनराव पाचपुते यांच्या स्टेजवर गेल्याने दुखावलेल्या मतदारांनी घन:शाम शेलार यांची वाट धरली. घन:शाम शेलार यांचा निसटत्या मताने पराभव झाला. घन:शाम शेलार यांना पडलेल्या मतांनी नागवडे, जगताप खडबडून जागे झालेत.
विधानसभेची निवडणूक झाल्याच्या दुसर्या दिवसापासून आमदार होण्यासाठी जगताप-नागवडे या द्वंद्वीनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे. खासदार सुजय विखे विशेषतः विखे कुटुंबीयांची माजी आमदार राहुल जगताप यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. श्री. जगताप हे विखे कुटुंबीयांमार्फत भाजपची उमेदवारी घेतील असा बोलबाला होता. मात्र श्रीगोंदा तालुक्यात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे.
या दृष्टीकोनातून जागेवरच थांबण्याचा निर्णय जगताप यांनी घेतला आहे. आपण राष्ट्रवादीतच राहणार असा निरोप त्यांनी विखे कुटुंबीयांकडे पोहोचविल्याची खात्रीलायक माहिती आहे. माजी आमदार राहुल जगताप यांना राज्य साखर संघावर संचालक करून त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत पक्षाने दिले आहेत.
नागवडे कुटुंबीयांचे विधानसभेच्या उमेदवारीची चलबिचल थांबता थांबत नाही. सहकारमहर्षी नागवडे कारखान्याच्या गळीत हंगामाला भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना आणून नागवडे यांनी काँग्रेस पक्षात आपण स्थिर नसल्याचे दाखवून दिले आहे. राजेंद्र नागवडे यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे बाळासाहेब थोरात यांनी त्यांना साखर संघाच्या संचालक पदावर न घेता बाबा ओहोळ या त्यांच्या दुसर्या फळीतील कार्यकर्त्याला संधी दिली.
श्रीगोंद्याच्या विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात वरचेवर स्पर्धा दिसत असली तरी बाळासाहेब थोरात हे नागवडे यांच्यासाठी किती ताकद खर्ची करतील याबाबत जाणकारांच्या मनात शंका आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत पाचपुते, शेलार यांना मुलांच्या उमेदवारीची लगीनघाई..!!
शासनाच्या धोरणामुळे थेट ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध होत असल्याने या निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. काष्टी, बेलवंडी, घोगरगाव, पारगाव या गावांसह दहा गावांची रणधुमाळी सध्या जोरात चालली आहे. आ. बबनराव पाचपुते यांना ऐनकेन प्रकारे मुलाला राजकारणात आणायचे आहे. जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने धाकटा मुलगा प्रतापसिंह पाचपुते यांना उमेदवारी करण्यासाठी आ. पाचपुते यांनी ताकद पणाला लावली आहे.
इकडे बेलवंडीत अण्णासाहेब शेलार यांनी चिरंजीव ऋषिकेश याला लग्नाअगोदर सरपंच करायचेच असा चंग बांधला आहे. तालुक्यातील या दोन्ही नेत्यांनी मुलांच्या भवितव्यासाठी आपली सगळी शक्ती एकवटली आहे.
hKWZxIStXoUPgeq