अहमदनगर । वीरभूमी - 04-Dec, 2022, 12:19 AM
कारचे हप्ते वसुली करणारा एजंट व त्याच्या साथीदाराने वाडेगव्हाण येथून वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असलेल्या सरदवाडी येथील तरूणांवर गोळीबार करीत नगर-पुणे महामार्गावर दहशत निर्माण केली.
पिस्टलमधून गोळीबार केल्यांनतर गोळी कारच्या वायफरला लागल्याने अनर्थ टळला. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यासंदर्भात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलवंडी पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार अक्षय अर्जुन औटी (रा. सरदवाडी, ता. शिरूर) यांचा आर.ओ फिल्टरचा व्यवसाय आहे. त्यांनी सन 2019 मध्ये फोक्स वॅगन कंपनीची कार (क्र.एमएच. 12, एसई 7557) ही टाटा फायनान्सचे अर्थसहाय्य घेऊन खरेदी केलेली आहे.
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून फायनान्सचा दरमहा असलेला 35 हजार रूपयांचा हप्ता थकलेला आहे. त्यामुळे फायनान्सचे हप्ते वसुल करण्यावरून हप्ते वसुली करणारा एजंट संकेत संतोष महामुनी या सरदवाडी येथेच राहणार्या इसमाबरोबर 26 जुन रोजी अक्षय याचे भांडण झाले होते. त्याबाबत अक्षय याने रांजणगांव एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती.
शुक्रवार दि. 2 डिसेेंबर रोजी वाडेगव्हाण येथे मित्र नितीन शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अक्षय त्याची कार घेऊन मित्र अक्षय पंडीत सोंडकर, प्रणित विलास नवले (दोघेही रा. कारेगांव, ता. शिरूर) तसेच अभिजित भरत नवले (रा. सरदवाडी, ता. शिरूर) यांच्यासह गेला होता.
या कार्यक्रमात संकेत संतोष महामुनी व संकेत सुरवसे (दोघेही रा. सरदवाडी) हे देखील उपस्थित होते. रात्री पावणेदहा वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून अक्षय व त्याचे मित्र नगर-पुणे महामार्गावरून सरदवाडी (ता. शिरूर) कडे निघाले असता ते बेलवंडी फाटा ओलांडून गुरूगणेश हायड्रोलिक या दुकानासमोर आले असता संकेत महामुनी याने पाठीमागून येऊन त्याच्याजवळील दुचाकी अक्षय याच्या कारला आडवी लावली. त्यावेळी अक्षय सोंडकर हा कार चालवित होता तर अक्षय औटी हा बाजूच्या सिटवर व इतर मित्र मागे बसलेले होते.
मोटारसायकल आडवी मारल्याने अक्षय सोंडकर याने कार थांबविली असता मोटारसायकलवर मागे बसलेला संकेत सुरवसे याने उतरून अक्षय औटी ज्या डाव्या बाजूस बसला होता. त्या दिशने हातातील पिस्टलने फायरिंग केली.
गोळीबारानंतर कारच्या डाव्या बाजूच्या वायफरला गोळी लागून ती काचेला लागली व कारची काच फुटली. गोळीबार करून दोघेही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. घटनेमुळे घाबरलेल्या अक्षय व त्याच्या मित्रांनी सुरूवातीस शिरूर पोलिस ठाण्यात जाऊन व त्यानंतर बेलवंडी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.
घटनेनंतर नगरचे उपविभागीय अधिकारी, शिरूर, सुपा, बेलवंडी पोलिस ठाण्याचे अधिकारी, नगर तसेच पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेतला.
iUfoeYFgRxEPsOz