शेवगाव पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
शेवगाव । वीरभूमी- 07-Dec, 2022, 10:39 PM
‘तोंडातील गुटखा बाहेर थूंकुन ये’ असे म्हटल्याचा राग येवून डॉक्टरला मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. तसेच डॉक्टरच्या केबिनमधील खुर्च्यां व टेबलवरील कागदपत्रे फेकून दिली. ही घटना ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवार दि. 7 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली.
डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात शासकीय कामांत अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपीचे नाव बलभिम मुरलीधर पठाडे (वय 44, रा. अमरापूर, ता. शेवगाव) असे आहे.
याबाबत ढोरजळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ. सुशिलकुमार सुरेश बडे (वय 34) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार दि. 7 डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करत असतांना तेथे आरोपी बलभिम मुरलीधर पठाडे (रा. अमरापूर) हा आला.
यावेळी त्याने गुटखा खाल्याने त्याचा बोलण्याचा आवाज अस्पष्ट येत होता. यामुळे त्याला तोंडातील गुटखा बाहेर थूंकुन ये, माझे अंगावर थुंकी उडत आहे, असे म्हटले. याचा त्यास राग आल्याने त्याने डॉक्टरच्या तोंडावर बुक्की मारुन शिविगाळ करत तेथील खुर्च्या फेकुन दिल्या व टेबलवरील कागदपत्रे अस्ताव्यस्त केली.
आरोपीने डॉक्टरला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथे उपस्थित डॉक्टर व कर्मचारी यांनी सोडवा-सोडव केली. त्यास ताब्यात घेत शेवगाव पोलिस ठाण्यात घेवून आले.
याप्रकरणी ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुशिलकुमार सुरेश बडे (वय 34, हल्ली रा. ढोरजळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी बलभिम मुरलीधर पठाडे (वय 44, रा. अमरापूर, ता. शेवगाव) याच्याविरोधात भादंवि कलम 353, 332, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments