अहमदनगर । वीरभूमी- 10-Dec, 2022, 02:10 PM
अहमदनगर ते मनमाड (Ahmednagar to Manmad), अहमदनगर ते टेंभूर्णी (Ahmednagar to tembhurni) व अहमदनगर ते पाथर्डी (Ahmednagar to pathardi) या तीन महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आ. निलेश लंके (Nilesh lanke) यांनी सुरू केलेले उपोषण आज चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले.
उपोषण मागे घेण्यासाठी विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मध्यस्थी करत थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना फोन केला. यावेळी मे 2023 अखेर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल असे लेखी पत्र राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
अहमदनगर ते मनमाड, अहमदनगर ते टेंभूर्णी व अहमदनगर ते पाथर्डी या तीन महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आ. निलेश लंके (Nilesh lanke) यांनी अहमदनगर (Ahmednagar) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात चार दिवसापूर्वी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला पाठिंबा म्हणुन अनेक ठिकाणी रास्तारोको, बंद आंदोलन करुन पाठिंबा देण्यात आला होता.
तसेच या उपोषणाला भाजपा वगळता सर्व पक्षियांचा पाठिंबा मिळाला होता. तर ठोस तोडगा निघाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका आ. निलेश लंके यांच्यासह उपोषणकर्त्यांनी घेतली होती. यामुळे हे उपोषण किती दिवस चालेल, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
आज शनिवारी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे श्रीगोंदा येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. तसेच दोन दिवसापूर्वी त्यांनी आ. निलेश लंके यांना फोन करुन तब्येतीची चौकशी केली होती. आज ते जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथे उपोषणस्थळी भेट देत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह आ. निलेश लंके यांच्याशी चर्चा केली.
चर्चे दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना थेट फोन करुन रस्त्याच्या प्रश्नाबाबत लक्ष घालण्याची मागणी करत परिस्थिती सांगितली. दरम्यान मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाचे प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान नाशिक विभागीय राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांनी डांबरीकरण झालेल्या लांबीतील खड्डे बुजविण्यास देवराई (ता. पाथर्डी) येथे सुरुवात केली असून 30 डिसेंबर 2022 अखेर रस्ता वाहतुकी योग्य होईल. तसेच सद्य परिस्थितीत अपूर्ण असलेले काम ठेकेदाराला दिलेल्या मुदतीनुसार मे 2023 अखेर पूर्ण होईल, असे पत्र दिले.
या आश्वासनानंतर आ. निलेश लंके व समर्थकांचे समाधान झाले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेत उपोषण सोडले.
यावेळी मा. जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, आ. संग्रम जगताप, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, डॉ. क्षितीज घुले, अॅड. हरिहर गर्जे, आपने किसन आव्हाड, बाळासाहेब हराळ, राजेंद्र दौंड, सतिष पालवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments