मढेवडगाव येथे भुरट्या चोरांनी तीन घरे फोडली
श्रीगोंदा । वीरभूमी - 16-Dec, 2022, 11:24 AM
मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथे बुधवार दि. 14 रोजी रात्रीच्या सुमारास गावाच्या मध्यवस्तीत असलेली तीन घरे भुरट्या चोरांनी फोडली. या चोरीच्या घटनेत किरकोळ स्वरूपाचा ऐवज गेल्याने याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याची चोरी झालेल्या घर मालकांनी तसदी घेतली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मढेवडगाव येथे दि. 14 व दि.15 रोजीच्या मध्यरात्री अज्ञात भुरट्या चोरांनी मध्य वस्तीतील जवळ जवळ असणार्या तिन बंद घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरांना किरकोळ रक्कम व चांदीचे किरकोळ दागिने हाती लागल्याने चोरांनी लवकरच येथून पोबारा केला. जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांचे कुटुंबीय, शिवाजी उंडे व एक शेजारी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.
हीच बाब ओळखून पाळत राखत चोरट्यांनी या घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला मात्र उचका पाचक करूनही चोरांच्या हाती विशेष काही मिळाले नाही. किरकोळ रक्कम व चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. सकाळी शेजारील नागरीकांच्या लक्षात चोरीची घटना घडल्याचे निदर्शनास आल्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्याला चोरीची माहिती कळवली. पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले मात्र किरकोळ चोरी झाल्याने कुणीही पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास तसदी घेतली नसल्याचे निदर्शनास आले.
लहान असो की मोठी, ती चोरीच
मोठी रक्कम, दागिने चोरी झाल्यास नुकसान झालेले नागरीक तत्परतेने पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद देतात. परंतू किरकोळ चोरी झाल्याने चोरी झालेल्या तीनही कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली नाही. यामुळे पोलिस प्रशासनाला चोर पकडण्यात कायदेशीर अडचणी निर्माण होतात. छोटी असो वा मोठी चोरी ती चोरीच असते. चोरी झाल्यावर नागरिकांनी रीतसर तक्रार दाखल केल्यावर पोलिसांना योग्य दिशेने तपासाची चक्रे फिरवता येतात.
Comments