निवडणूक ग्रामपंचायतीची मात्र लढाई विधानसभेची
काष्टीत आ. पाचपुते यांच्या 40 वर्षांच्या राजकारणाला सुरुंग लावण्यासाठी विरोधक एकवटले
विजय उंडे । वीरभूमी- 17-Dec, 2022, 12:23 AM
श्रीगोंदा ः आमदार बबनराव पाचपुते यांच्या पाठीशी कुटुंब एकसंघपणे 40 वर्षे राहिले. मात्र या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव प्रतापसिंह व त्यांचे सख्खे बंधू कै. सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव साजन यांच्यात सरपंचपदासाठी काष्टीत सामना रंगला आहे. आ. पाचपुते यांनी पुतण्यावर चक्रव्यूह टाकले की, विरोधकांनी पाचपुते यांना चक्रव्यूहात अडकवले याचा निकाल दि. 18 रोजी मतदान झाल्यानंतर लागणार आहे.
आ. बबनराव पाचपुते 40 वर्षे श्रीगोंदा तालुक्याची सत्ता एकहाती ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या पाठीशी कै. सदाशिव पाचपुते सावली सारखे उभे असत. कै. सदाशिव पाचपुते यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात कलह असल्याच्या चर्चा रंगत होत्या.
काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने हा कलह जनतेसमोर आला. सख्खे चुलत बंधू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने अनेक मतदारांची पंचाईत झाल्याचे चित्र आहे. आ. बबनराव पाचपुते यांच्यावर नागवडे कारखाना निवडणुक व काष्टी सोसायटी निवडणुकीत पाठीवर वार झाले. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय दुखावले गेले होते.
या असंतोषाची परिणीती या निवडणुकीत असल्याचे बोलले जाते. भविष्यात सामना करण्यापेक्षा आजच काय ते घोडा मैदान होऊन देऊ. या भावनेने आ. पाचपुते कुटुंबीयांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
आ. पाचपुते यांच्या घरातच सामना लागावा यासाठी त्यांचे विरोधक अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. या निवडणुकीच्या निमित्ताने वरवर ते यशस्वी झाल्याचे दिसत आहे. काष्टी ग्रामपंचायत निवडणूक ही जिल्ह्यासह राज्यात कुटुंबातील वादळामुळे चर्चेत आली आहे.
आ. बबनराव पाचपुते यांच्या 40 वर्षांच्या अनुभवाचा कस या निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे. कै. सदाशिव पाचपुते यांच्या सहनभुतीची शिदोरी साजन पाचपुते यांच्याजवळ असणार आहे. या दोन भावांमधील टक्कर कोटीची उड्डाणे घेणार आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात एकुण 10 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. त्यातील बनपिंप्री ग्रामपंचायत बिनविरोध झाली. उर्वरीत नऊ ग्रामपंचायतीसाठी दि. 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यात लक्षवेधी अर्थात हॉटस्पॉट काष्टी ग्रामपंचायत निवडणुक होत आहे. काष्टी नंतर बेलवंडीची निवडणूक अण्णासाहेब शेलार यांचे अविवाहित पुत्र ऋषिकेश यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आली आहे.
श्रीगोंद्याच्या पूर्व भागात ग्रामपंचायत निवडणुकीची सर्वाधिक गावे आहेत. त्यातील तांदळी दुमाला येथे मतदारांची संख्या कमी आहे. मात्र सरपंचपदाचे दोन्ही उमेदवार तगडे असल्याने निवडणूक सुरू झाल्यापासुन मतदारांची दररोज चंगळ होत आहे.
अण्णासाहेब शेलार हे श्रीगोंद्याच्या राजकारणात महत्त्वाकांक्षी नेते म्हणून परिचीत आहेत. 2015 साली आमदार बबनराव पाचपुते यांच्या विरोधात तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी एकत्रित मोट बांधली होती. त्यावेळी पाचपुते विरोधक असलेले बहुतांशी नेते एकत्रितरीत्या कोल्हापूर परिसरातील एका ज्योतिषाकडे गेले होते. त्या ज्योतिषाने श्रीगोंदा तालुक्याची राजकीय कुंडली या नेत्यांसमोर ठेवली. कुंडलीनुसार श्रीगोंदा तालुक्याला बीन लग्नाचा मुलगा आमदार होऊ शकतो हे त्या ज्योतिषाने सांगितले होते. त्यानुसार राहुल जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊन पुढे ते आमदार झाले. अण्णासाहेब शेलार यांच्या डोक्यात ज्योतिषाचे ते वाक्य आजही घुमत आहे. त्यांचे चिरंजीव ऋषिकेश हे अविवाहित असुन ऐनवेळी विधानसभा निवडणुकीत कसेही पत्ते पडू शकतात. हे चाणाक्ष अण्णासाहेबांनी हेरून मुलाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे केले आहे. बेलवंडी गावातील त्यांच्या विरोधकात बेबनाव करण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत. ऋषिकेश तेथे सरपंच पदासाठी विक्रमी मताने विजयी झाल्यास नवल वाटायला नको.
WdvAaLFjxikX