राष्ट्रवादीचे शेवगाव आगार प्रमुखांना निवेदन
शेवगाव । वीरभूमी - 17-Dec, 2022, 11:09 AM
शेवगाव आगारातून सायंकाळी 5 वाजता मिरी मार्गे जाणारी शेवगाव ते अहमदनगर ही एसटी बस गेल्या महिन्यापासून ढोरजळगाव येथे तब्बल दोन ते तीन तास उशिराने पोहोचत असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. ही बस वेळेवर सोडण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत शेवगाव आगार व्यवस्थापकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवेदन दिले आहे. या निवेदनावर सभापती क्षितीज घुले यांच्यासह शहराध्यक्ष कमलेश लांडगे, संतोष जाधव, विद्यार्थी तालुकाअध्यक्ष अभिजीत आहेर, रोहण साबळे, कृष्णा सातपुते यांच्या सह्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, मिरी मार्ग अहमदनगर येथे जाणारी शेवगाव आगाराची एसटी बस सायंकाळी 5 वाजता आगारातून सुटते. ती बस 5.20 वाजता ढोरजळगाव येथे पोहोचते. या बसने ढोरजळगाव येथून शाळेतील विद्यार्थी, अहमदनगर येथे जाणारे प्रवाशी यांना लाभ होतो. मात्र मागील महिनाभरापासून सायंकाळी 5 वाजता सुटणारी ही बस दोन ते तीन तास उशिराने सुटत आहे. यामुळे ढोरजळगाव येथे ती उशिराने पोहोचत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना थंडीच्या दिवसात घरी जाण्यास उशिर होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. होणारे शैक्षणिक नुकसान व त्रास कमी करावा यासाठी शेवगाव आगाराने मिरी मार्गे अहमदनगर ही बस वेळेवर सोडावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बस सुरळीत न झाल्यास विद्यार्थ्यांसह रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
Comments