शेवगाव । वीरभूमी - 17-Dec, 2022, 02:51 PM
शेवगाव ते श्रीक्षेत्र देवगड असा सायकल प्रवास दोन तासात पूर्ण करत शेवगाव सायकल क्लबने आरोग्याचा संदेश देत भगवान दत्तात्रयांसह किसनगिरी महाराज, भास्करगिरी महाराज यांचे दर्शन घेतले. यामध्ये 16 सायकलिस्ट सहभागी झाले होते. शेवगाव सायकल क्लबने आतापर्यंत वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवून आरोग्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याचाच भाग म्हणून श्रीक्षेत्र देवगडपर्यंत 16 सायक्लिस्ट यांनी सायकलवर प्रवास करून मार्गामध्ये विविध लोकांना आरोग्याचा संदेश दिला. जीवनात आरोग्य किती महत्त्वाचे आहे, याचा विचार करणे महत्वाचे आहे. प्रारंभी शेवगाव मधून डॉ. श्रीकांत देवढे व डॉ. निखिल काकडे यांनी सर्वांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
कुठेही न थांबता एका तासामध्येच 25 किलोमीटर प्रवास पूर्ण करून भेंडा येथे पोहचल्यानंतर येथील स्वागत हॉटेल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे व त्यांच्या पत्नी भेंडा बुद्रुकच्या माजी सरपंच संगीताताई गव्हाणे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी गणेश गव्हाणे शुभेच्छा देत म्हणाले की, या धकाधकीच्या जीवनामध्ये मोटरसायकलच्या खाली न उतरणारा व्यक्ती आरोग्याच्या बाबतीत मागे पडत आहे. परंतु आपण आरोग्य हीच धनसंपदा म्हणून पर्यावरणाच्या संरक्षणसाठी प्रयत्न करत आहात. हा आदर्श नवीन पिढी समोर ठेवला आहे. आज माणसाकडे पैसा, धनसंपदा सर्वकाही आहे, परंतु आरोग्य नाही.
अतिशय आनंददायी वातावरणात झालेला हा प्रवास नेवासा फाटा येथेही विठ्ठल साडी सेंटरचे बाबासाहेब भूमकर मेजर यांनी चहापानाची व्यवस्था करून सत्कार केला. त्यानंतर सायकल प्रवास करत श्रीक्षेत्र देवगड येथे पोहोचल्यावर दत्तगुरूंचे दर्शन घेऊन महंत भास्करगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर स्नेहभजनाचा आस्वाद घेऊन परतीचा प्रवास पुन्हा दोन तासात पूर्ण केला.
या स्तुत्य उपक्रमात डॉ. संदीप बोडखे, डॉ. जगदीश कुलकर्णी, निळकंठ लबडे, आबा नेमाने, डॉ. प्रदीप उगले, विनोद शेळके, संजय बडे, प्रा. मच्छिंद्र आधाट, कैलास जाधव, राम नेव्हल, भागनाथ काटे, भारत दहिवाळकर, सुभाष पवार, यशवंत तुपे, प्रशांत सुपेकर, प्रदीप बोडखे आदीसह सायकल रायडर्स यांनी सहभाग घेतला. नियोजित वेळेत ही आपली देवदर्शन यात्रा आनंदवारी संपन्न झाली.
IqSbBinYXektx