शेवगाव । वीरभूमी- 21-Dec, 2022, 04:09 PM
पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावरील जमीन संपादित शेतकर्यांना मोबदला मिळावा. या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोधेगाव येथे शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
हा प्रश्न मार्गी न लागल्यास दि. 26 जानेवारी रोजी शेतकरी सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी दिला.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, मुंगी, हातगाव, लाडजळगाव, शेकटे खुर्द या गावातून पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे गेल्या पाच सहा वर्षांपासून काम सुरू आहे. परंतु रस्त्यासाठी जमीन संपादित केल्यानंतरही शेतकर्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. यामुळे संबधित शेतकर्यांनी मोबदला मिळावा यासाठी महामार्गाचे काम बंद पाडले आहे.
संबंधित ठेकेदार व अधिकारी हे प्रशासनला हाती घेऊन कामात अडथळा आणनार्या शेतकर्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत आहेत. प्रशासनाची ही मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.
अधिकारी, ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांची मिलिभगत असून या प्रश्नावर कोणी बोलत नाही, असा आरोप आंदोलकानी केला. हा प्रश्न मार्गी न लागल्यास लोकप्रतिनीला या परिसरात फिरकू देणार नाही व दि. 26 जानेवारी 2023 रोजी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्यासह महिला आघाडी तालुकाध्यक्ष संगीता ढवळे, बन्नोभाई शेख, प्यारेलाल शेख, माजी सरपंच रामजी अंधारे, अशोक लाड, डॉ. निलेश मंत्री, धोंडीराम मासळकर, अरविंद सोनटक्के, आदित्य मोरे, गंगाभिषण घोरतळे, फारूक सय्यद, चांद शेख, बबन सय्यद, कारभारी नरोटे, किशोर मातंग, ईश्वर मोरे, राजेंद्र बनसोडे, अरविंद सोनटक्के, निलेश ढाकणे, गौतम भोंगळे यांच्यासह या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आंदोलकांनी खासदार, आमदार यांच्या विरोधी घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
Comments