संकेत नवलेच्या मारेकर्यांचा तपास लावा
अकोलेत मशाल मोर्चा काढून एकमुखी मागणी
अकोले । वीरभूमी- 23-Dec, 2022, 12:12 AM
संगमनेर येथे नवलेवाडी येथील संकेत नवले या तरुणाची हत्या होऊन 13 दिवस होऊन गेले. मात्र अद्याप पोलिसांना मारेकर्यांचा शोध घेता आला नाही. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी नवलेवाडी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी गुरुवारी सायंकाळी अकोले पोलिस ठाण्यावर मशाल मोर्चा काढला.
यावेळी मोर्चेकर्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अकोले पोलिसांचा निषेध करत संकेत नवले याच्या मारेकर्यांचा शोध घेऊन तातडीने अटक करावी, अशी मागणी केली. यावेळी झालेल्या निषेध सभेत अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील संकेत सुरेश नवले या महाविद्यालयीन तरुणाची संगमनेरात अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर नवलेवाडी ग्रामस्थांनी बैठक घेऊन पोलिसांना सहकार्य करुन दशक्रीयाविधी होईपर्यंत पोलिस तपासाला वेळ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संकेत नवलेचा दशक्रियाविधी होऊन दोन दिवस उलटून गेल्यानंतरही, पोलीस यंत्रणेला संकेतच्या हत्येप्रकरणी अद्याप एकही पुरावा हाती लागला नाही.
त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेच्या भूमिके विरोधात विशेष ग्रामसभा घेऊन गुरुवारी सायंकाळी मशाल मोर्चा काढला. तसेच हुतात्मा स्मारकापासुन सुरु झालेला हा मोर्चा पोलिस ठाण्यावर आल्यानंतर निषेध सभा झाली. या मशाल मोर्चामध्ये महिला, पुरुष, अबालवृद्ध व सर्व राजकीय पक्षांचे नेते, पुढारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकर्यांनी निषेध सभेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, तहसीलदार सतिष थेटे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, संकेत नवले या युवकाचा खून होऊन 10 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले तरी पोलीस यंत्रणेला गुन्हेगारांचा शोध लागत नाही, या पेक्षा मोठे दुर्दैव नाही. अशी टीका करीत या मागे कोणती मोठी यंत्रणा काम करीत नाही ना? अशी शंका उपस्थित करण्यात आली. जर पोलीस यंत्रणा गुन्हेगारांचा शोध लावण्यास सक्षम नसेल तर शासनाने हा तपास सायबर गुन्हे शाखेकडे किंवा सीबीआयकडे सोपवून लवकरात लवकर संकेत नवलेचे गुन्हेगार शोधून काढावेत, अन्यथा या पुढे नवलेवाडीकर पुढील पाऊल उचलतील व ते शासनाला खूप महागात पडेल, असा इशारा देत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
या मशाल मोर्चाला सर्व पक्ष, वकील संघ, स्वाभीमानी शेतकरी संघटना, वारकरी संघ, प्राथमिक शिक्षक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, रोटरी क्लब, व्यापारी वर्ग, कर्मचारी वर्ग, शिक्षक वर्ग, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, अबाल वृद्ध यांनी पाठींबा दिला. यावेळी अकोले शहरातील कोल्हार - घोटी रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालेली होती.
विशेष करून हा मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने काढण्यात आला. मात्र या गुन्ह्याचा शोध लवकर लागला नाहीतर हाच मोर्चा नंतरच्या काळात कोणते रूप धारण करीन हे सांगता येणार नाही. असे चित्र आज पहायला मिळाले. यावेळी मधुकरराव नवले, डॉ. अजित नवले, अॅड. वसंतराव मनकर, सदाशिव साबळे, अॅड. शांताराम वाळुंज, मिनानाथ पांडे, सोनालीताई नाईकवाडी, महेश नवले, सुरेश नवले, राजेंद्र सदगीर आदीसह अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी विजय वाकचौरे, विठ्ठलराव चासकर, शंभु नेहे, विक्रम नवले, विलासराव नवले, विकास नवले, आनंदराव नवले, येलुबा नवले, नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, विलास आरोटे, शरद नवले, साईनाथ नवले, डॉ. संदिप कडलग, भाऊसाहेब चासकर, अॅड. सदानंद पोखरकर, दत्ता नवले, स्वाती शेणकर, मंदाबाई नवले, ज्योती गायकर व सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नेते पदाधिकारी सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
KUHrXcxEOFqme