काष्टीतील 25 लाखांच्या मटक्याचा नादच खुळा... चर्चांना उधाण
विजय उंडे । वीरभूमी - 31-Dec, 2022, 08:47 AM
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीचा धुरळा खाली पडतो न पडतो तोच उपसरपंचपदाची निवडणूक झाली. एकीकडे उपसरपंचपदाची निवडणूक चालू असताना दुसरीकडे एका जणाला 25 लाखांचा मटका लागला.
गाव कारभारी निवडणूक राहिली बाजुला मात्र जास्त चर्चा अचानक लागलेल्या मटक्याच्या आकड्याचीच चौकाचौकात चर्चिली जाऊ लागली.
या मटक्याचे झाले असे की, शासनाने मटक्यावर बंदी घातल्याने तो चोरून खेळला जातो. अनेक वर्षांपासून काष्टीत मटका बंद होता. मात्र चंगळवादी माणसांच्या हव्यासापोटी मटका काल परवाच सुरू झाला. गुपचुप खेळल्या गेलेल्या या मटक्यामध्ये एक जणाला चक्क 25 लाखांचा मटका लागला.
मटका लागलेला बहाद्दर गडी त्याने शेवटपर्यंत 25 लाखांच्या आकड्याचा मागमूस मित्र मंडळीना लागू दिला नाही. या मटक्याची चर्चा क्षणार्धात गावभर पसरली. लागलीच काष्टी येथील झिरो पोलिस सावध झाले. मटका कोठे खेळला गेला? तो कोणाला लागला? याचा ते क्षणार्धात शोध घेऊ लागले. संपूर्ण गाव या झिरो पोलिसांनी धुंडाळले.
गावात थांगपत्ता न लागल्याने वाड्या-वस्त्यांवर शोध घेण्याचा प्रयत्न झाला. आकडा 25 लाखांचा लागला मात्र माणूस शोधता सापडेना!! बिच्चारे झिरो पोलिस दमून गेले. पर्यायी त्यांनी त्यांचे खाजगी श्वानपथक कामाला लावले. मटका लागलेला माणूस आहे तरी कोण? याबद्दल सगळ्याच गावात कुतूहल निर्माण झाले. काही केल्या गावातील नागरिकांचे समाधान होता होईना.
शेवटी खाजगी श्वानपथक एका घराजवळ जायचे अन् परत पाठीमागे यायचे. श्वानपथकाच्या या वागण्याने झिरो पोलिसही चक्रावले. त्यांनी स्वतःच शोध घेण्याचे ठरविले.
श्वानपथक ज्या घरी जायचे त्या घराकडे झिरो पोलिसांनी आपला मोर्चा वळवला. मात्र ते घर पाहून झिरो पोलिस अचंबित झाले. मटका लागलेले घर झिरो पोलिसांच्या नात्यातलेच निघाल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
AWHclCpU