शेवगाव । वीरभूमी - 19-Jan, 2023, 09:40 AM
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाअंतर्गत शेवगाव नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे टेंडर निघाले आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पाणीयोजना रखडण्याची शक्यता आहे.
तरी नगरपालिका प्रशासनाने तातडीने निविदा प्रक्रिया राबवून पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात करावी, अन्यथा दि. 26 जानेवारी रोजी शहरातील नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष, उपनगराध्य, नगरसेवकांसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी दिला आहे.
याबाबत शेवगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन राऊत यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत टेंडर प्रकाशित झाले आहे. मात्र ई-निविदाची फायन्सियल बीट ओपन करण्याची मुदत संपलेली आहे.
शेवगाव शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न ज्वलंत असतांना ई-निविदा ओपन करण्यास नगरपालिका प्रशासन जाणिवपूर्वक विलंब करत असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन फायन्सियल बीट ओपन करुन तातडीने टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन वर्क ऑर्डरची प्रोसेस लवकरात लवकर करण्यात आली पाहिजे.
मात्र टेक्निकल बाबीचा मुद्दा पुढे करुन त्या नावाखाली कुठल्या तरी एजन्सीची हितसंबध जोपासण्यासाठी शहराला वेढीस धरल्याचे निदर्शनास येत आहे. तरी आलेल्या सर्व निविदा तात्काळ फायन्सियल बीट ओपन करुन जो लोयेस्ट असेल त्यास मंजुरी देवून पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात यावा.
सदरील निविदा प्रक्रियेला जाणिवपूर्वक आपण टेक्निकल अडथळा निर्माण केल्यास शेवगाव शहराची पाणी योजना रखडण्याची शक्यता आहे. तरी असे झाल्यास दि. 26 जानेवारी 2023 रोजी नगरपालिकेस कोणतीही पुर्वसुचना न देता शहरातील नागरिक व माजी नगरसेवकांसह नगरपालिकेत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर माजी नगराध्यक्ष राणी विनायक मोहिते, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, गटनेते सविता दहिवाळकर, माजी नगरसेवक कमलेश गांधी, नंदा कोरडे, शारदा काथवटे, रेखा कुसळकर, विकास फलके, शब्बीर शेख, अजय भारस्कर यांच्या सह्या आहेत.
Comments