अकोले । वीरभूमी- 22-Feb, 2023, 03:50 PM
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणार्या ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या (निळवंडे धरण) 5 हजार 177 कोटी 38 लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे निळवंडे प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार असल्याचे सांगतानाच या निर्णयाबद्दल माजी आमदार वैभवराव पिचड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे आभार मानले आहेत.
निळवंडे प्रकल्पाची उच्चस्तरीय कालवे, पिंपरकणे उड्डाण पूल, माळेगाव उपसा सिंचन योजना ही कामे निधी अभावी रेंगाळली होती. ही कामे पूर्ण व्हावीत म्हणून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आ. वैभवराव पिचड यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत निदर्शनास आणून दिले. सुधारित मान्यता मिळाल्यामुळे आता ही कामे मार्गी लागतील, असे वैभवराव पिचड यांनी सांगितले.
तालुक्यात प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे धरण बांधण्यात आले आहे. धरणाची क्षमता 8 हजार 320 दलघफु असून धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. धरणात या पूर्वीच पाणी साठविण्यास सुरवात झाली असली तरी कालव्याची कामे अपूर्ण आहेत. त्या मुळे धरण पूर्ण होऊनही लाभ क्षेत्रास सिंचनाचा लाभ होत नाही.
धरणास 85 किमी लांबीचा डावा आणि 97 किमी लांबीचा उजवा कालवा आहे. या दोन्ही कालव्यातून 68 हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. 2027 पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील 182 गावांना सिंचनाचा लाभ होईल असे माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले.
ते पुढील म्हणाले की, पिंपरकणे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर अनेक गावांचा तुटलेला संपर्क पुन्हा सुरळीत होऊन त्या भागातील नागरिकांची दळणवळणाची सोय होणार आहे व राजूर ची बाजारपेठ फुलण्यास मदत होणार आहे. म्हाळादेवी येथील जलसेतूचे काम पूर्ण झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या उच्च स्तरीयउजव्या कालव्यामुळे अकोले तालुक्यातील अंबड, धामणगाव आवारी, वाशेरे, मनोहरपूर, कळस, सुगाव, पानसरवाडी, परखतपुर, धुमाळवाडी, नवलेवाडी, या भागाला पाणी मिळून तेथील शेती फुलणार आहे.
माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या उच्च स्तरीय उजव्या कालव्यामुळे ज्या भागांना पाणी मिळत नव्हते अशा भागांना आता पाणी मिळणार आहे. माजीमंत्री पिचड यांनी राज्यात ‘जलपुरुष’ म्हणून जी प्रतिमा तयार केलेली आहे ती खर्या अर्थाने या निमित्ताने पुन्हा झळाळून निघाली आहे, असे वैभवराव पिचड म्हणाले.
माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने त्यांचे निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकर्यांनी अभिनंदन केले आहे.
qaRWStusxjEdfeD