गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, अन्यथा मोठे जनआंदोलन
सर्वपक्षियांचा पाथर्डी पोलिस ठाण्यावर मोर्चा । सराफावरील हल्ल्यातील गुन्हेगारांना तातडीने पकडण्याची मागणी
पाथर्डी । वीरभूमी - 25-Feb, 2023, 12:58 AM
साहेब... पाथर्डी शहरासह तालुक्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. छेडछाड, रस्ता लूट, सोनसाखळी व मोबाईल चोरी, अतिक्रमणे, गुंडागर्दी अशा सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. हे सर्व गैरप्रकार थांबवून ‘कानून के हात लंबे होते है’ याची प्रचिती येण्यासाठी तालुक्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करून व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा मिळावी, यासाठी आपण तात्काळ कडक पावले उचलावीत. अन्यथा आम्हा सर्वांना आपली बदली होईपर्यंत मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल, असा सूचक इशारा अॅड. प्रताप ढाकणे यांनी दिला.
गुरुवारी सायंकाळी शहरातील सराफा व्यापारी बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर चोरीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करण्यात आला. याच्या निषेधार्थ पाथर्डी शहरातील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व व्यापारी संघटनांनी पाथर्डी बंदची हाक दिली होती. सकाळी दहा वाजता शहरातील नवीपेठ येथून मोर्चाला सुरुवात झाली. पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या ठिकाणी मोर्चेकरांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
यावेळी अॅड. प्रताप ढाकणे यांच्यासह सुभाष घोडके, भाजपाचे राहुल राजळे, अभय आव्हाड, विष्णुपंत अकोलकर, माणिक खेडकर, नंदकुमार शेळके, अमोल गर्जे, मृत्युंजय गर्जे, मुकुंद गर्जे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू बोरुडे, चांद मणियार, शिवसेनेचे विष्णुपंत ढाकणे, सागर गायकवाड, मनसेचे देविदास खेडकर, संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, शिवसेनेचे (ठाकरे) भगवान दराडे, काँग्रेसचे नासिर शेख, वंचितचे अरविंद सोनटक्के, रत्नमाला उदमले, सविता भापकर यांच्यासह व्यापारी व शहरातील त्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाथर्डी तालुक्यामध्ये पूर्णपणे गुंडाराज झाला असून कायद्याचा धाक कोणालाही राहिला नाही. फक्त वाहनधारकांना दंड करणे व सर्वसामान्यांना वेठीस धरणे, परीक्षा काळामध्ये कॉफी देणार्यांना सोडून झेरॉक्स दुकानदारांना मनमानी पद्धतीने त्यांच्या दुकाना बंद करणे, खोटे गुन्हे दाखल करणे. गुन्हेगारांशी संगनमत करून त्यांना पाठीशी घालने. अशा प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
यामुळे सामान्य नागरिकांना पोलिसांचा आधार वाटत नसून भीती वाटत आहे. जुने व नवीन बसस्थानक, सर्व मुख्य चौक, आठवडे बाजार या दिवशी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रकार घडत आहेत. यामुळे शहरातील व्यापारी पेठ उध्वस्त होत असून अनेक व्यापारी स्थलांतरांच्या मार्गावर आहेत.तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावे वाढत्या गुन्हेगारीमुळे ओस पडली आहेत. तालुक्यात ऊस तोडणी, कोळसा कामगार व कष्टकरी नागरिक बहुसंख्य असल्यामुळे मौल्यवान चीज वस्तूंची चोरी झाल्यानंतर त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते.
यामुळे अनेकदा मोठा कौटुंबिक कलह होऊन, आप्तेष्टामध्ये गैरसमज देखील निर्माण होत आहेत. तरी येथील पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी कर्मचार्यांची गांभीर्याने चौकशी करून तसेच त्यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासून दोषी असणार्या अधिकारी कर्मचार्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा सात दिवसानंतर पाथर्डी शहरासह संपूर्ण तालुका बंद ठेवून मोठे जनआंदोलन करण्यात येईल.
अशा प्रकारच्या संतप्त भावना विविध पक्षिय नेते व व्यापारी बांधवांनी व्यक्त केल्या. मोर्चाला उत्तर देताना पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण म्हणाले की, येत्या आठ दिवसांमध्ये आरोपींचा शोध घेऊन तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करू, असे सांगितले.
WVwbAQrjCxmT