अतिवृष्टीच्या अनुदानासह विविध मागण्यांसाठी आंदोलन । मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
शेवगाव । वीरभूमी - 25-Feb, 2023, 01:08 AM
राज्य शासन फक्त घोषणाबाजी करत असून शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईचे फक्त आकडे सांगितले जातात, मात्र शेतकर्यांच्या खात्यावर अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. अतिवृष्टीचे अनुदान तातडीने द्यावे तसेच शेतीमालाला योग्य भाव द्यावा यासह इतर मागण्यांसाठी शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे संतप्त शेतकर्यांनी रास्तारोको आंदोलन केले. येत्या 15 दिवसात याची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला.
या आंदोलनात शेतकरी मंडळाचे शिवराज कापरे, मळेगावचे माजी सरपंच चंद्रकांत निकम, अमरापुरचे माजी सरपंच विजय पोटफोडे, चेअरमन बाळासाहेब पोटफोडे, सचिन खैरे, सुभाष अडसरे, सुधाकर पोटफोडे, दिलीप पोटफोडे आदी शेतकरी सहभागी झाले होते.
गत वर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांसाठी शासनाने अनुदान मंजुर करुनही अद्याप ते शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाही. तसेच यंदाही हवामानाच्या बदलाने खरीप व रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तरीही महसूल प्रशासनाने रब्बीची नजर आणेवारी 75 पैसे जाहीर करुन प्रशासनाने शेतकर्यांवर अन्याय केला आहे. आता अंतिम आणेवारी 50 पैशाच्या आत लावण्याची मागणी केली आहे.
तसेच कपाशीला 11 हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, अतिवृष्टीचे अनुदान त्वरीत शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, रब्बीची अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत जाहीर करावी, सन 2022 -23 मधील खरीप पिक विमा मिळावा, नियमीत कर्ज फेड करणार्या शेतकर्यांचे 50 हजार रुपये अनुदान मिळावे, शेतकर्यांसाठी असलेली सौरपंप योजना कृषी खात्यामार्फत ऑफलाईन करण्यात यावी अशा मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी अमरापुर येथील मुख्य चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनात परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. तहसील कार्यालयाचे महसुल लिपीक संतोष गर्जे यांनी निवेदन स्विकारल्या नंतर आंदोलन स्थगीत करण्यात आले. पोनि. विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
PpCrWveKySiMmuhf