इथेनॉल प्रकल्पाला लागली आग । आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न
शेवगाव । वीरभूमी - 25-Feb, 2023, 08:01 PM
तालुक्यातील नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आज शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान मोठी आग लागली आहे. ही आग इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
आगीने रौद्ररुप घेतले असून इथेनॉल असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक आहे. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. कारखाना प्रशासन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. आगीपासून बचाव होण्यासाठी परिसरातील नागरिक, कामगार, कर्मचारी यांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात येत आहे.
नजीक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प आहे. या प्रकल्पातील इथेनॉलच्या टाक्या फुटून आग लागली. इथेनॉलनमुळे आग मोठ्या प्रमाणात भडकत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारखान्यातील कामगार, कर्मचारी यांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात येत आहे.
आगीची तीव्रता मोठी असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी कारखाना प्रशासन मोठी कसरत करत असून सर्वांना सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले आहे. कारखान्याकडे कोणीही जावू नये, याबाबत खबरदारी घेतली जात आहे.
सद्य परिस्थितीत इथेनॉल प्रकल्पाला आग लागली त्यावेळी 32 कामगार तेथे काम करत होते. आग लागल्यानंतर सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शेवगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन रणजितभैय्या मुळे यांनी दिली. तसेच कारखाना प्रशासनाविरोधात काही व्यक्तींकडून बदनामी करण्याच्या दृष्टीने अफवा पसरविल्या जात आहेत. अशा अफवा कोणीही पसरवू नये, असे आवाहन रणजित मुळे यांनी केले आहे.
SpvKPgoRDeyGAwrE