शेवगाव । वीरभूमी - 26-Feb, 2023, 12:05 PM
तालुक्यातील नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भिषण आग लागली. ही आग इथेनॉलच्या टाक्यांना लागल्याने मोठे स्फोट होत होते. यामुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या अथक आठ तासाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
तत्पुर्वी आगीची घटना घडताच तेथे काम करणार्या 32 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले. त्यांना शेवगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र या आगीमध्ये कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान भिषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज गंगामाई साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजितभैय्या मुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आग लागली त्यावेळेस कारखान्यात 32 कामगार काम करत होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र स्फोट होवून पळापळ झाल्याने दोन कामगार किरकोळ जखमी झाले. त्यांना शेवगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
इथेनॉलला आग लागल्याने त्याची तीव्रता जास्त होती. यामुळे परिसरातील सर्वांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आग विझवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ठिकाणाहुन आलेले अग्निशमन बंब शर्थीचे प्रयत्न करत होते. दरम्यान तब्बल आठ तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र यामध्ये कारखान्याने कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
गंगामाई कारखान्याला आग लागल्याची माहिती कळताच तहसीलदार छगन वाघ, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोनि. विलास पुजारी यांच्यासह कारखाना प्रशासन, महसूलचे कर्मचारी, पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बारीक लक्ष ठेवून होते.
कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजित मुळे, समीर मुळे यांनी कामगारांना धीर देत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
कारखाना अॅटोमायझेशिएन असल्यामुळे आग लागली त्यावेळी तेथे 32 कामगार काम करत होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज असून सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र यातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून कामगार, परिसरातील ग्रामस्थांनी कारखाना प्रशासनाला सहकार्य करावे. कोणीही अफवा पसरवू नये. - रणजितभैय्या मुळे, कार्यकारी संचालक
खोटी माहिती एडिट करुन बदनामी करणार्यावर गुन्हा दाखल
गंगामाई कारखान्याला भिषण आग लागल्यानंतर ‘वीरभूमी’ने बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र या बातमीच्या हेडिंगमध्ये अज्ञाताने ‘70 पेक्षा जास्त कामगार मृत्यूमुखी’ अशी ओळ समाविष्ट करुन ती बातमी वीरभूमीच्या लिंकसह इतर व्हॉटस्अॅप ग्रुपवर शेअर केली होती. याप्रकरणी वीरभूमीचे संपादक महादेव दळे यांनी संबधितांवर सायबर क्राईमकडे तक्रार करुन चुकीची माहिती एडिट करुन बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पो.ना. अनिल बडे हे करत आहेत.
Comments