आ. मोनिकाताई राजळे यांची माहिती
पाथर्डी । वीरभूमी - 02-Apr, 2023, 12:57 PM
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास विभाग अंतर्गत प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2022-23 अंतर्गत पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसराचे श्रध्दास्थान असणार्या संत तुकाराम महाराज मंदीर, माणिकदौंडी येथील विविध विकास कामांसाठी 1 कोटी 60 लक्ष रुपयांच्या तसेच कानिफनाथ देवस्थान मढी येथील मढी ते तिसगांव रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 40 लक्ष रुपये मंजूर झाल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, माणिकदौंडी, ता. पाथर्डी या दुर्गम भागातील परिसरातील नागरीकांचे श्रध्दास्थान असलेल्या संत तुकाराम महाराज मंदीर परिसराच्या विकास कामांसाठी शासनाचा निधी मिळावा, यासाठी माणिकदौंडी व परिसरातील नागरीकांची सातत्याने मागणी होती. त्यामुळे आ. मोनिका राजळे यांनी शासनाच्या पर्यटन विकास विभागाकडे पाठपुरावा केला.
त्याला यश येवून संत तुकाराम महाराज मंदीर परिसरातील भक्त निवास बांधकाम, मंदीर परिसरात वॉल कंपाऊड, मंदीर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, सिडीवर्क व कॉक्रीट रस्ता, परिसर सपाटीकरण इत्यादी कामांसाठी 1 कोटी 60 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला, तसेच नाथ सांप्रदायात अत्यंत महत्वाचे स्थान असणारे श्री कानिफनाथ मंदीर मढी येथून तिसगांवकडे जाणार्या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण होण्यासाठी, परिसरातील नागरीक, भाविक भक्त व मढी देवस्थान ट्रस्ट यांनी हा रस्ता होणेसाठी वारंवार मागणी केली होती.
पर्यटन विकास विभागाअंतर्गतच मढी - तिसगांव रस्त्यासाठी 3कोटी 40 लक्ष रुपयाच्या कामास मंजूरी मिळाली आहे. यासाठीचा शासन निर्णय क्र. टिडीसी 2023/03/प्र.क्र. 120 / पर्यटन 29 मार्च व शासन निर्णय क्रमांक - टीडीसी 2023/03/प्रक्र 150/ पर्यटन 31 मार्च 2023 नुसार निधी प्राप्त होणार आहे. या दोन्ही तिर्थक्षेत्रांना परिसर विकासासाठी निधी दिल्याबद्दल पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे आमदार मोनिका राजळे यांनी आभार मानले.
TfKsiBFzNJlvt