ज्याची गाडी दुसर्याच्या डिझेलवर चालते, त्यांनी निष्ठेच्या गप्पा करू नयेत
बाबासाहेब भोस यांची टीका । आमदारकीला राहुल जगताप यांना मदत करून चूक झाली ः राजेंद्र नागवडे
विजय उंडे । वीरभूमी- 05-Apr, 2023, 12:11 AM
श्रीगोंदा : माझ्यावर पक्ष निष्ठेच्या टीका करणार्यांच्या गाड्या ज्यांच्या डिझेलवर चालतात त्यांना कपड्यापासून दरमहा किराणा पुरवला जातो. पुरवठादाराचे लांगुलचालन करण्यासाठी काहीजण बेफाम आरोप करत सुटले असून खाल्लेल्या ‘अन्नाला’ नावाप्रमाणे ते जागत असल्याची टीका नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी करत दै. वीरभूमीशी बोलताना काही नेत्यांचा बुरखाच फाडला.
बाबासाहेब भोस म्हणाले, गेल्या 40 वर्षांपासून मी स्वतः च्या हिंमतीवर श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात कार्यरत आहे. ज्यांना आमदार बबनराव पाचपुते यांनी पहिलवानकीच्या आखाड्यातून बोटाला धरून राजकारणात आणले. आ. पाचपुते यांनी सगळी ताकद देऊन नावारूपाला आणले. त्याच पाचपुते यांच्याशी गद्दारी केली. ज्यांच्या नसानसात गद्दारी ठासून भरलेली आहे, तेच आम्हाला खोट्या निष्ठेचे सल्ले देत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्याचे राजकारण दुषित करणारी टोळी सक्रिय झाली आहे.
निवडणुका आल्या की, एखाद्या नेत्याची तळी उचलायची. त्या बदल्यात आपली झोळी भरून घ्यायची. मतदारांची करमणूक करणार्या या तथाकथित नेत्यांची वाट आगामी सर्वच निवडणुकात मतदार लावल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही बाबासाहेब भोस यांीं दै. वीरभूमीशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व बाबासाहेब भोस यांची संयुक्त पत्रकार परिषद श्रीगोंदा येथे पार पडली.
पत्रकार परिषदेत राजेंद्र नागवडे यांनी माजी आमदार राहुल जगताप यांच्यावर कडाडून टीका केली. विधानसभेला इच्छा नसतानाही राहुल जगताप यांना मदत केली. मात्र त्या मदतीची परतफेड ते आमच्याशी घातपाताचे राजकारण करून करत आहेत. माजी आमदार राहुल जगताप यांना अनेक निवडणुकांत मदत केली. मात्र आमच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी आम्हाला त्रास देण्याचेच काम केले.
आमच्या विरोधात खतपाणी घालत त्यांच्या राजकारणाचा पोरकटपणा त्यांनी दाखवून दिला आहे. यावेळी राजेंद्र नागवडे यांनी बाळासाहेब नहाटा यांचाही समाचार घेतला. कार्यकर्त्यांचा विरोध असूनही बाळासाहेब नहाटा यांना मार्केट कमिटीचा सभापती केले. भानगाव पंचायत समिती गणातून निवडून आणले. त्याच नहाटांनी आम्हाला मात्र प्रत्येक निवडणुकीत त्रास दिला.
आम्हाला त्रास देणार्यांचा बंदोबस्त उद्याच्या काळात मतदार करतील असा विश्वासही श्री. नागवडे यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला संचालक सुभाष शिंदे, प्रशांत दरेकर, श्रीनिवास घाडगे, राजेश पाचपुते, भाऊसाहेब बरकडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष धर्मनाथ काकडे आदी उपस्थित होते.
श्रीगोंद्यातील काही नेते तालुक्यात एका पक्षाचे तालुक्याबाहेर दुसर्या पक्षाचे ः भोस श्रीगोंदा तालुक्यातील काही नेते तालुक्याच्या राजकारणात गाडीला एका पक्षाचा झेंडा बांधतात अन् तालुक्याच्या बाहेर निघाले की, त्या पक्षाचा झेंडा काढून दुसर्या पक्षाचा झेंडा लावतात. या वेगवेगळ्या पक्षाशी निष्ठावंत असणार्या नेत्यांनी मी कोणत्या पक्षात आहे, हे पक्षाध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांना विचारावे, असा खोचक सल्लाही बाबासाहेब भोस यांनी टीका करणार्यांना दिला.
काहीजण सकाळी एका पक्षात, दुपारी दुसर्या पक्षात अन् रात्री तिसर्या पक्षात ः राजेंद्र नागवडे श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात सध्या पोरकटपणाचा कळस झाला आहे. काहीजण सकाळी एका पक्षात असतात दुपारी दुसर्या पक्षात जातात तर रात्री तिसर्या पक्षात फिरून येऊन दुसर्या दिवशी शहाजुकपणाच्या गप्पा मारतात, अशी टीकाही राजेंद्र नागवडे यांनी केली.
8h6117